गडचिरोली (Gadchiroli) :- ‘शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक ही उद्याचे भविष्य निर्माण करणारी गुंतवणूक आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांचे स्पर्धात्मक ज्ञान वाढले पाहिजे, ते शहरातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा परीक्षांत उतरतील इतकी गुणवत्ता त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. यासाठी शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचवणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री (Minister of State) तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी केले.
सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांचे प्रतिपादन ,‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सहपालकमंत्री जयस्वाल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुरखळा येथे आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभागी झाले होते. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, मुरखळा ग्रामपंचायतीचे सरपंच दशरथ चांदेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश चौधरी, मुख्याध्यापक दौलत घोडाम, शिक्षक शैलेश खंगारे, प्रकाश मुद्दमवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहपालकमंत्र्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून त्यांचे शाळेत आगमन उत्सवमय पद्धतीने पार पडले. त्यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक संचांचे वाटप केले आणि उपस्थित पालक, शिक्षक व ग्रामस्थांसोबत संवाद साधला.
शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो
यावेळी ना. जयस्वाल यांनी सांगितले की, शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. आज मी तुमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आलो आहे. हे दृश्य पाहून मलाही माझ्या शाळेतील पहिल्या दिवसाची आठवण झाली. अभ्यासात मन लावा, शिक्षकांचे मनापासून ऐका आणि आपल्या कुटुंबाचा, गावाचा, जिल्ह्याचा आणि देशाचा अभिमान वाढवा, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी सरकारच्या वतीने सतत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांचे गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष असून, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, दळणवळण, रोजगार यांसारख्या सर्व क्षेत्रांमध्ये विकास घडवून आणण्यासाठी निधी आणि योजना मंजूर केल्या जात आहेत असे ते म्हणाले.
या शाळेचे १९५० मध्ये प्रथम विद्यार्थी असलेले वासुदेव मांदाळे यांचा सहपालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. शाळा प्रवेशोत्सवाला शिक्षक, पालक आणि विद्यार्थी , स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




