पोलिसांचे दुर्लक्ष; माफिया मालामाल
भंडारा (IPL Betting) : गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या आयपीएलवर तूफान सट्टेबाजी (IPL Betting) सुरू आहे. त्यासाठी वेगवेगळे अॅप विकसित करण्यात आले असून बेईमानीच्या या धंद्यात मात्र ईमानदारी ठेवली जाते. आज सट्टा लावा. जिंकले तर लगेच पैसे अन् हरले तर आठ दिवसांनी द्या, अशा प्रकारची सोयही अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे टॉससह प्रत्येक ओव्हरमधील बॉल अन् त्या ओव्हरमध्ये किती धावा निघणार या बार्बीवर सट्टा लावण्यात येतो. परंतू पोलिसांना मात्र हे सट्टेबाज सापडत नाहीत, हे विशेष.
१०० रुपयांपासून ते लाखो रुपयांची रोज लागते बेट
दरवर्षी होणारे आयपीएल हे सट्टेबाज (IPL Betting) आणि पोलीस दलातील काही झारीतील शुक्राचार्यासाठी सुगीचे दिवस असतात. दोन महिन्यांच्या काळात सट्टेबाज आणि त्यांना अभय देणारे पोलिसही मालामाल होतात. असाच आजवरचा अनुभव आहे. भंडारा शहरात राम मंदिर परिसर, मढा कॉलनी, जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक परिसरात यासह अनेक ठिकाणी या बुकींनी आपले अड्डे सुरू केले आहेत. सामना सुरू होण्यापूर्वी करण्यात येणार्या टॉसपासून हा बेटींगचा खेळ सुरू होता. त्यात प्रत्येक ओव्हरमध्ये धावा किती निघणार, यावर रक्कम लावली जाते. विशेष म्हणजे त्यासाठी वेगवेगळे अॅप काढण्यात आले आहेत.
या अॅपवर एकदा लॉगीन केले की सामन्यावर सट्टा (IPL Betting) लावता येतो. त्यासाठी आज सट्टा लावा अन् आठ दिवसांनी पैसे द्या, अशी सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतू अशी सोय फक्त विश्वासू लोकांनाच मिळते. त्यातून या सट्टाबाजारात दररोज भंडारा शहरात लाखोंची उलाढाल सुरू आहेत. परंतू ती पोलिसांना दिसत नाहीत.
पैशांऐवजी अॅपवर पॉईंट असा उल्लेख
बेटींग अॅपवर (IPL Betting) पैशांऐवजी पॉईंट असा उल्लेख करण्यात येतो. जेणेकरून पकडले गेल्यानंतर कायद्याच्या कचाट्यात सापडू नये, यासाठी ही पळवाट शोधण्यात आली आहे. अॅपमध्ये आपल्या अकाऊंटमध्ये जमा होणार्या पॉईंटवरून ती रक्कम घेतली किंवा दिली जाते.
आयपीएल सट्टाबाजार पुन्हा जोमात
जिल्ह्यातील सट्टाबाजाराचे रॅकेट (IPL Betting) अजूनही जोमाने सक्रिय आहे. अनेक लोक यात सक्रिय झाले असून या क्षेत्रातील विश्वसनीय सूत्रांनुसार या रॅकेटच्या माध्यमातून दररोज कोटींचा सट्टा खेळला जात आहे.
तुमसर पोलिसांना जमले ते भंडारा पोलिसांना का नाही?
भंडारा जिल्ह्यात यापूर्वी क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणार्या विरुद्ध अनेक वेळा कारवाई करण्यात आली. तुमसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे सुद्धा दाखल आहेत. परंतू भंडारा शहर हा जिल्ह्याच्या प्रमुख शहर आहे. भंडारा शहरात (IPL Betting) आयपीएल सट्टा मोठ्या प्रमाणात सुरू असून सुद्धा पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसून आले नाही. आयपीएल सट्टा फक्त तुमसर शहरातच खेळतात काय, असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.




 
			 
		

