पैनगंगा नदीत 2019.138 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु: मराठवाड्याचा विदर्भाशी संपर्क तुटलेलाच!
कळमनुरी (Isapur Dam) : ईसापुर धरणामध्ये 100 % उपलब्ध पाणीसाठा झाल्याने पाण्याचा विसर्ग पाहता ईसापुर धरण प्रकल्प प्रशासनाने (Administration) दि.18 ऑगस्ट रोजी धरणाचे 13 दरवाजे उघडले असुन, यात 5 दरवाजे 2 मीटर उघडले असुन 8 दरवाजे 1.50 मीटरने उघडून पैनगंगा नदी पात्रात 2019.138 क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. ईसापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दिवसात झालेला पाऊस व पाणलोट क्षेत्राअंतर्गत असलेल्या क्षेत्राअंतर्गत असलेल्या पेनटाकळी व कोरड्या प्रकल्पामधून पेनगंगा नदी पात्रात पाणी येत असल्यामुळे या वर्षी टप्प्या टप्प्याने ईसापुर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. 17 ऑगस्ट रोजी धरणाची पाणी पातळी 441 मिटरपर्यंत पोहोचली असून, उपयुक्त पाणीसाठा 964.0994 दलघमी एवढा झाला असुन, धरण 100% भरले आहे. त्यातच पाणलोट क्षेत्रामधील बंधार्यामधून होत असलेल्या पाण्याचा विसर्ग पाहता इसापूर धरणाच्या मंजूर प्रचलन आराखड्यानुसार धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा कायम ठेवून येणार्या पाण्याची आवक पाहता ईसापुर धरण प्रकल्प प्रशासनाने दि.17 ऑगस्ट रोजी धरणाचे तेरा वक्रद्वारे उघडून पैनगंगा नदी पात्रात 2019.138 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सोडला आहे. त्यामुळे पैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, धरणाच्या 13 दरवाजामधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असताना धरणामध्ये येणार्या पाण्याची आवक पाहून पाण्याचा विसर्ग वाढविणे अथवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याने पैनगंगा नदी (Panganga River) काठच्या गावकर्यांना (Villagers) सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती इसापूर धरण पूरनियंत्रण तथा उपविभागीय अभियंता एच.एस. धुळगुंडे यांनी दिली आहे.
मराठवाड्याचा विदर्भाशी तीन दिवसांपासून संपर्क तुटला!
मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेल्या ईसापुर धरणाच्या पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली असुन, ईसापुर धरण हे 100% भरले आहे दि. 18 ऑगस्ट रोजी ईसापुर धरणाच्या सांडव्याचे तेरा वक्रद्वार उघडून पेनगंगा नदी पात्रात 2019.138 क्युमेक्स ने धरणातील अतीरीक्त पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्याचा विदर्भाशी जोडणार्या रस्त्यावर शेंबाळपिंप्री रस्त्यावरील शिऊर पुलावरून धरणाचे पाणी वाहू लागल्याने मराठवाड्याचा विदर्भाशी संपर्क पूर्णतः तुटल्याने वाहतूक सलग तिसर्या दिवशी सुद्धा विस्कळीत झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (District Collector Rahul Gupta) यांची ईसापुर धरणाला भेट-ईसापुर धरणाचे तेरा दरवाजे मागील 2 दिवसापासून उघडल्यानंतर, पेनगंगा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ईसापुर धरणास भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला तसेच परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते आदींची उपस्थिती होती.