Wardha :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वांनाच उत्सूकता लागलेली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका (Elections)आगामी काळात होऊ घातलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ५२ गट आणि पंचायत समितीच्या १०४ गणांची आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छूकांच्या स्वप्नावर विरजण पडले. तर दुसरीकडे अनेक इच्छुकांना आनंद झाला. एकूणच कही खुशी कही गमचे चित्र निर्माण झाले.
लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत काढण्यात आली
जिल्हा परिषद (Zilla Parishad) व पंचायत समितीच्या निवडणूकीकरीता जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदासाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिलासह राखीव ठेवावयाच्या सदस्य पदासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे तसेच राजकिय पक्षाचे प्रतिनिधी, पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व नागरिक उपस्थित होते. तसेच पंचायत समिती सदस्य पदासाठी संबंधीत तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदारांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी देखील राजकिय पक्षाचे प्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
जिल्हा परिषदेकरिता आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. यावेळी लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत काढण्यात आली. सोडतीच्या वेळी जिल्हा परिषदेचे अनेक माजी पदाधिकारी, सदस्य, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी मागील सदस्यांना धक्का बसला. अनेक ठिकाणी इच्छुकांनि सोडत जाहीर आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.




