Darwah :- स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात घडलेली हृदयद्रावक व धक्कादायक घटना समोर आल्यानंतर अखेर प्रशासन हरकत घेतली आहे. मद्यधुंद (Drunk) अवस्थेतील डॉक्टरने जिवंत रुग्णाला मृत घोषित करून शवविच्छेदनाची (Autopsy) तयारी सुरू केली होती. या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी तीव्र झाली आहे.
डॉक्टरच्या वागणुकीवर संशय आल्यावर त्यांनी आक्षेप नोंदवताच गोंधळ उडाला
दारव्हा तालुक्यातील गोरेगाव येथील एका नागरिकास विषबाधा झाल्यामुळे शुक्रवारी रात्री (दि. २५ जुलै) उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. ड्युटीवर असलेल्या डॉक्टर महेश राठोड यांनी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत रुग्णाची तपासणी केली व त्याला मृत घोषित केले. इतकेच नव्हे, तर शवविच्छेदनाची तयारी देखील तातडीने सुरू करण्यात आली. रुग्णाच्या नातेवाईकांना डॉक्टरच्या वागणुकीवर संशय आल्यावर त्यांनी आक्षेप नोंदवताच गोंधळ उडाला. त्यानंतर लगेचच रुग्णाला यवतमाळ येथे रेफर करण्यात आले, आणि तेथे त्याचा जीव वाचवण्यात यश आले. हा प्रसंग उजेडात आल्यानंतर डॉक्टरच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करण्यात आला. सदर प्रकरणात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरला मेमो दिला. मात्र, नागरिकांचा संताप एवढ्यावरच शांत झाला नाही. अनेकांनी अधीक्षकांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले.
…त्यांचा मोबाईल मागील दोन दिवसांपासून ‘नॉट अन्सरिंग’
गेल्या काही दिवसांपासून दोषी डॉक्टरविरोधात तक्रारी, व्हिडीओ (Video), ऑडिओ क्लिप (Audio clip) सोशल मीडियावर फिरत असताना उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने झोपेचे सोंग का पांघरले होते असा सवाल नागरिक उपिस्थत करत आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोग्य उपसंचालकांनी चौकशीचे आदेश दिले असून, सोमवारी उशिरा चौकशी समिती दारव्हा येथे दाखल झाली होती. या समितीत निवासी वैद्यकीय अधिकारी, दोन वरिष्ठ डॉक्टर आणि एक लिपिक यांचा समावेश असून त्यांनी संबंधित डॉक्टर, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्यांची थातूरमातूर चौकशी केल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान सदर प्रकाराची माहिती घेण्यासाठी वैद्यकीय अधीक्षकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल मागील दोन दिवसांपासून ‘नॉट अन्सरिंग’ दाखवीत आहे.
त्यामुळे सदर प्रकरणाची माहिती देण्यास ते टाळाटाळ करत असल्याचा संशयही नागरिक व्यक्त करत आहेत. चौकशी समिती च्या अहवालावरून दोषी डॉक्टर वर कारवाई होणार क्लीनचिट मिळणार याकडे सध्या शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. परंतु रुग्णाच्या जीवाशी खेळ करणार्या डॉक्टरवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता सामाजिक, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातूनही होत आहे