हिंगोली (Hingoli) :- आध्यात्मिक मार्गाने जीवनात येते समाधान आध्यात्मिक मार्गाने प्रत्येक माणसाच्या जीवनात समृद्धी आणि आनंद येतो. म्हणूनच प्रत्येकाने सत्संग ऐकून संतांचे विचार आपल्या जीवनात आत्मसात करावेत, असे श्री श्री १००८ मॉं कनकेश्वरी देवीजी यांनी श्रीराम कथा ज्ञानयज्ञात मार्गदर्शन करताना सांगितले. त्रिशूल नवदुर्गा महोत्सव समितीच्या वतीने मंगळवारा परिसरातील श्री दत्तमंदिर येथे रविवारी सुरू झालेल्या श्रीराम कथा (Shriram Katha) ज्ञानयज्ञ कार्यक्रमाच्या तिसर्या दिवशी मंगळवार दि.१ एप्रिल रोजी मॉं कनकेश्वरी देवीजी यांनी सांगितले की, आध्यात्मिक मार्गाने प्रत्येक माणसाच्या जीवनात समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. चांगले विचार नेहमी माणसाला उर्जा देतात. सत्संगाचा मुख्य प्रभाव असा असतो की, व्यक्ती मायेच्या प्रभावापासून मुक्त होतो.
आध्यात्मिक मार्गाने प्रत्येक माणसाच्या जीवनात समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते
ईश्वराची अनंतता आणि भक्तीचा मार्ग या विषयावर मार्गदर्शन करताना मॉं कनकेश्वरी देवीजी म्हणाल्या की, ईश्वराची अनंतता आपल्याला देखील अनंततेकडे घेऊन जाते. जो व्यक्ती आपल्या जीवनात ईश्वराचे नामस्मरण हेच सर्वस्व मानतो, तोच खर्या अर्थाने नामनिष्ठ होतो. भगवानाचे नामस्मरण केल्याने भक्ताला प्रभूच्या कृपेचा अनुभव येतो आणि तो आपल्या जीवनात सुख-शांती आणि आत्मिक समाधान प्राप्त करतो. रामभजन आणि समाजसेवेचे महत्त्व साधनेच्या विविध अवस्थांवर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, साधकाच्या प्रारंभिक आणि अंतिम अवस्थेत रामभजन हेच महत्त्वाचे असते. तर मधल्या काळात साधक समाजसेवेच्या माध्यमातून आपले जीवन अर्थपूर्ण बनवतो. म्हणूनच संत-महात्मे नेहमी मानवसेवेचे महत्त्व सांगतात. सत्य आणि गुरु-कृपेचे महत्त्व मॉं कनकेश्वरी देवीजी यांनी व्यापक सत्ता जाणून घेण्यासाठी सत्याचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, सगुण असूनही नामाचे स्वरूप निराकार असते, त्यामुळे ईश्वराच्या नामस्मरणाने आध्यात्मिक उंची गाठता येते. जीवनात उन्नतीसाठी गुरुकृपा हे एकमेव साधन आहे आणि या स्थितीत स्थिर राहण्यासाठी भगवन्नामाचे जप करणे अत्यंत आवश्यक आहे.
श्रीराम कथा ज्ञानयज्ञ तिसर्या दिवशी सुरुवातीला महामंडळेश्वर मॉं कनकेश्वरी देवीजी यांचा सत्कार यजमान किशोर सुनिलकुमार मुंदडा व रमेशचंद्र सावरमल बगडिया यांनी केला. भाविक भक्तांची हजारोंच्या संख्येने श्रीराम कथा ऐकण्यासाठी गर्दी होत आहे. येथे येणार्या भाविक भक्तांना दररोज कथा समाप्तीनंतर महाप्रसादाचे वितरण केले जाते. श्रीराम कथा महायज्ञामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे.




