निर्णय तात्काळ मागे घेण्याची यवतमाळ काँग्रेसची मागणी!
यवतमाळ (Local Government Elections) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा (VVPAT) वापर न करण्याचा निर्णय निवडणूक आयोगातर्फे घेण्यात आल्याने लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेला बाधा पोहोचणार असा आरोप यवतमाळ काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला.
जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर यवतमाळ काँग्रेस कमिटीच्या वतीने धडक देत जिल्हाधिकार्यांना (District Collector) निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये निवडणुकीत ईव्हीएमद्वारे मतदान झाल्यानंतर मतदारांना त्यांचे मतदान योग्य प्रकारे नोंदविल्यात आले की नाही, याची खात्री मिळावी यासाठी व्हीव्हीपॅट ही अत्यावश्यक सुविधा आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पारदर्शकतेसाठी या यंत्रांचा वापर केला जातो, तर स्थानिक निवडणुकांत हीच पारदर्शकता का नाकारली जात आहे, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. तसेच स्थानिक प्रतिनिधींची निवड प्रक्रियाही तितकीच निःपक्षपाती व विश्वासार्ह असणे गरजेचे असल्याने हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात करण्यात आली.