हिंगोली शहरात शनिवारी जनसंवाद रॅली
हिंगोली (Manoj Jarange Patil) : शहरात ६ जुलैला (Maratha warrior) मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपस्थितीत जनसंवाद रॅली पार पडणार आहे. या रॅलीस लाखोंच्या संख्येने जनसमुदाय एकत्र येणार असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, जवाहर रोड, महात्मा गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, इंदिरा गांधी चौक अशा मार्गाने जाणार आहे. या मार्गावरून रहदारीस अडथळा निर्माण होण्याची व चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी ६ जुलै रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान वाहतुकीच्या नियमा संबंधाने अधिसूचना काढली आहे.
ज्यामध्ये वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद असलेल्या मार्गामध्ये नांदेड-इंदिरा गांधी चौक-महात्मा गांधी चौक-अंबिका टॉकीजपर्यंत सर्व वाहनांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. शिवाजीनगर चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-रेल्वे स्टेशन रोड-सिद्धार्थ कॉलनीपर्यंत सर्व वाहनांना वाहतूक पूर्णपणे बंद राहील. इंदिरा गांधी चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-रिसालापर्यंत तसेच जुनी नगर पालिका चौक-अंबिका टॉकीज पर्यंत सर्व वाहनांकरीता वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे ६ जुलैला सकाळी ७ ते सायंकाळी ५ दरम्यान वाहतुकीस अडथळा होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता पर्यायी मार्गाची अधिसूचना काढण्यात आली आहे.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग
वाशिम ते नांदेड जाणारे व येणारे वाहन बायपासने प्रवास करतील. वाशिम ते औंढा नागनाथकडे येणारे व जाणारे वाहने उमरा फाटा पिंपळदरी मार्गे औंढा नागनाथ प्रवास करतील. सेनगाव ते कळमनुरी जाणारे व येणारे वाहने नर्सी फाटा ते औंढा नागनाथ पिंपळदरी मार्गे कळमनुरी जातील. सेनगाव ते नांदेड जाणारे वाहने औंढा नागनाथ मार्गे प्रवास करतील.
जड वाहनास पूर्णपणे बंद असलेला मार्ग
नर्सी टी-पॉईंट, खटकाळी बायपास, अकोला बायपास येथून हिंगोली शहरात येणारे सर्व जड वाहनास प्रवेश बंद राहणार आहे. रॅली निमित्ताने बुधवारी पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या उपस्थितीत (Maratha warrior) सकल मराठा समाजाची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. रॅली शांततेत पार पाडण्याचे आवाहन (Hingoli City Police) पोलिसांनी केले.