आरक्षणाने धोका दिल्यावर पती राजा शोधणार पर्याय !
मानोरा (Manora Elections) : आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीत अनेक इच्छुक पुरुषांच्या पदरी निराशा पडली आहे. पण निवडणूक लढविण्याच्या त्यांच्या महत्वाकांक्षाला आरक्षणाचा खोडा येऊ शकलेला नाही. मला नाही तर माझ्या बायकोला म्हणत इच्छुकांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा चंग बांधून तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे इच्छुक यंदाच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघात कुठे पत्नी, कुठे आई , कुठे मुलगी तर कुठे बहिणीला निवडणूक मैदानात उतरविणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत विजयी होऊन मलिदा खाणारे यावेळेस नक्कीच मतदार संघातील गट व गणात निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी मागील एका वर्षापासून सुरू केली होती. मीच उभा राहणार असे कार्यकर्त्यांना ओली पार्टी देत वर्षभर प्रयत्न करणाऱ्या इच्छूक उमेदवारांना आरक्षणाने महीला आरक्षण जाहीर होऊन धोका दिला आहे. त्यामुळे अचानक अनपेक्षितपणे महिला आरक्षण निघाल्याने पुरुष इच्छुक उमेदवाराचा हिरमोड झाला आहे. परंतु अनेकांनी मैदानातून माघार न घेता माझी लाडकी बायको उमेदवार राहील असे रणसिंग फुकून तयारीला वेग दिला आहे. मला निवडणूक लढविता येत नसली तरी माझ्या सौभाग्यवतीला जनतेचा भक्कम पाठिंबा आहे. अश्या भूमिकेतून निवडणूक रिंगणात दोन हात करण्याची तयारी करीत आहे.
गेले वर्षभर स्वतःला बॅनरवर झळक येणारे इच्छुक उमेदवार आता आरक्षण सोडत झाल्यापासून आपल्या सौभाग्यवतींना बॅनरवर झळकवताना दिसू लागले आहेत. यामुळे या निवडणुकीत बायको माझी लाडकी चा प्रयोग रंगण्याची चिन्हे कुपटा, आसोला खुर्द, पोहरादेवी या जिल्हा परिषद सर्कलमध्ये दिसून येत आहे. मानोरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे ८ गट व पंचायत समितीचे १६ गण आहेत. कोणता राजकीय पक्ष कोणाशी युती करेल हे आगामी काळातच माहित पडणार असून ग्रामीण भागातील गावागावातील चौकात, पारावर चर्चेला उधाण आले आहे. वाशिम जिल्हा परिषदे अध्यक्ष पदाचे आरक्षण एसटी महीला राखीव व पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण एस सी महीला राखीव महिलाकरिता आरक्षित असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मानोरा तालुक्यातून सर्वाधिक तर विधानसभेत महायुतीला लीड होता. हे विशेष!
महिला आरक्षणामुळे स्वतःला निवडणूक लढविता येत नसली तरी अनेकांनी निवडणुकीच्या रिंगणात आपल्या धर्मपत्नीला उतरविण्याचा चंग बांधला आहे. निवडणुकीत महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा सामना रंगणार असुन याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सोबतच यावेळची निवडणूक चुरशीची आरपार होण्याचे चिन्ह आतापासूनच दिसत आहे.




