25 पेक्षा अधिक शेतकर्यांचे वायर नेले चोरुन गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल!
परभणी (Theft Crime) : परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील इसाद, सांगळेवाडी येथील व अन्य गावातील शेतकर्यांनी शेतात पाणी देण्यासाठी मासोळी प्रकल्पात पाण्याच्या मोटारी सोडल्या आहेत. या मोटारीचे विद्युत वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. 25 पेक्षा अधिक शेतकर्यांचे (Farmers) लाखो रुपये किंमतीचे साहित्य चोरीला गेले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल!
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, इसाद, सांगळेवाडी व इतर गावातील शेतकर्यांनी शेताला पाणी देण्यासाठी मासोळी प्रकल्पात मोटारी सोडल्या आहेत. इसाद येथील ज्ञानोबा रंगनाथ सातपुते यांच्या विद्युत मोटारीचे जवळपास 300 फुट वायर चोरीला गेले. याचप्रमाणे परिसरातील इतर शेतकर्यांचेही वायर चोरीला गेल्याचे उघडकीस आले. ज्ञानोबा रंगनाथ सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. ऐन पेरणीच्या हंगामात शेतकर्यांच्या मोटारीचे विद्युत वायर चोरीला गेल्याने सिंचनाचा प्रश्न उभा टाकला आहे. घटनेची माहिती समजल्यानंतर सपोनि. आदित्य लोणीकर, सपोउपनि. युसुफ खान पठाण, पोलिस अंमलदार शिवाजी बोमशेटे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. प्रकरणाचा तपास पोलिस अंमलदार संभाजी शिंदे करत आहेत.