‘मांजरा’ परिवाराकडून उसाच्या मापात पाप, रिकव्हरीत पाप, भावात पाप, तोडणीत पाप!
लातूर (MLA Rameshappa Karad) : मांजरा परिवारातील साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याची अडवणूक आणि पिळवणूक वर्षानुवर्षे सुरू असून उसाच्या मापात पाप, रिकव्हरीत पाप, भावात पाप, तोडणीत पाप केले जात आहे. मांजरा परिवारापेक्षा गूळ पावडर कारखाने उसाला अधिक भाव देत आहेत. मशीनने तोडणी करून गाळपास आलेल्या उसात पाचटाचे प्रमाण अधिक असल्याचे सांगून कपात केली. हे प्रकरण अंगलट येणार लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांना पाचट कपातीचे पैसे दिले. पैसे द्यायचेच होते तर कपात का केले? असा सवाला आमदार रमेशअप्पा कराड (MLA Rameshappa Karad) यांनी केला.
लातूर तालुक्यातील सावरगाव व अंकोली येथे विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा रविवारी सायंकाळी आ. कराड यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी देशमुख परिवारावर जोरदार टीका केली.
आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, मागील गळीत हंगामात कार्यक्षेत्रात हक्काचा मुबलक ऊस असताना गेटकेन ऊस आणून शेतकऱ्याचा ऊस वाळविला. केंद्र शासनाने रिकव्हरी बंधनकारक केल्यापासून बारा-तेरा येणारी उसाची रिकव्हरी आता का कमी होऊ लागली? ऊस तोच, शेतकरी तोच, जमीन तीच, मग काय पाण्यात बदल झाला का कशात? शेतकऱ्यांच्या पैशाची लूट करायची आणि कळवळा दाखवायचा हे यापुढे चालणार नाही, असा इशारा (MLA Rameshappa Karad) त्यांनी दिला.
हेच साहेबांचे स्वप्न आहे का?
लातूर ग्रामीणच्या निष्क्रिय आमदाराविरुद्ध जनतेत प्रचंड नाराजी असून निवडणुका जवळ आल्याने संपूर्ण देशमुख कुटुंब गावोगाव फिरून स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी माझ्या मुलाला पदरात घ्या, असे भावनिक आवाहन त्यांच्या मातोश्री करीत आहेत. शेतकऱ्याची लूट, हेच साहेबांचे स्वप्न आहे का? असा जाहीर सवाल भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड (MLA Rameshappa Karad) यांनी केला आहे.
निवडून गेलेल्या काँग्रेस आमदाराला जनतेशी काहीही घेणे-देणे नाही. कधी कोणाला भेटत नाहीत, विकास कामासाठी निधी आणण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र काहीच न करता हे मी केलं, हे माझ्यामुळे झाले, असे सांगून श्रेय लाटण्याचा प्रयत्न मात्र केला जात आहे.