येत्या दोन-तीन दिवसात आगामी भूमिका स्पष्ट करणार
अमरावती (MLA Sulabha Khodake) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या वतीने माझ्यावर सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आल्याची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती मिळाली. याबाबत शहराच्या राजकारणातही चर्चा होत असतांना मी माझी पहिली प्रतिक्रिया माध्यमांमधून व्यक्त करीत आहे.
मी वर्ष २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला. माननीय सोनियाजी गांधी यांनी आपल्याला उमेदवारी दिली , पक्षाच्या तिकिटावर व पंजाच्या चिन्हावर २०१४ मध्ये बडनेरा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती, तसेच वर्ष २०१९ ला पुन्हा काँग्रेस पार्टीकडूनच अमरावती मतदार संघातून निवडणूक लढवीत विजयी झाले, प्रतिस्पर्धी उमेदवाराचा तब्बल २० हजार मतांनी पराभव केला.
काँग्रेस पार्टीने दोनवेळा उमेदवारी दिल्या बद्दल माननीय सोनियाजी गांधी व इतर जेष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करते. गेल्या पाच वर्षांपासून मी काँग्रेस पक्षाचीच आमदार म्ह्णून कार्यरत आहे. कधीही काँग्रेस पक्षाची लोकशाही व धर्मनिरपेक्ष विचारधारा सोडलेली नाही. काँग्रेस पक्षाने दोन वेळा उमेदवारी देऊन काम करण्याची संधी दिल्या बद्द्दल मी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व युवा नेते खा. राहुलजी गांधी तसेच इतर वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करीत आहे. माझी आगामी भूमिका मी येत्या दोन -तीन दिवसात जाहीर करणार आहे.