परभणी/सेलू (Money laundering) : आपण मनी लाँड्रिंगच्या वेगवेगळ्या राज्यातील प्रणालीशी जोडलेले आहात. आपल्या विरुध्द निघालेले वारंट तुर्त स्थगित ठेवण्यात आले आहे. आम्ही पोलीस आहोत, तुम्हाला काही होणार नाही, असे म्हणत विश्वास संपादन करुन एकाची १७ लाख ३८ हजार ९८ रुपयांची फसवणूक (Money laundering) करण्यात आली आहे. हा प्रकार २० ते २३ ऑगस्ट या दरम्यान घडला. सदर प्रकरणी २९ ऑगस्टला अज्ञातावर सेलू पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिक नंदलाल कुंदनानी यांनी तक्रार दिली आहे. २० ऑगस्टच्या दुपारी त्यांना अज्ञाताने फोन केला. तुमचे पार्सल ईराण येथील सीमा शुल्क विभागाने पकडले आहे. आपण मुंबई क्राईम ब्रांचकडे तक्रार करा, असे म्हणत ऑनलाईन कॉल जोडून दिला. त्यानंतर समोरील व्यक्ती हिंदी भाषेमध्ये मी क्राईम ब्रांचमधून बोलत आहे, आपण (Money laundering) मनी लाँड्रिंगच्या प्रकरणाशी जोडलेले आहात, तुमच्या विरुध्द निघालेले वारंट तुर्त स्थगित ठेवले आहे, असे सांगितले. फिर्यादीचे आधार कार्ड घेत नेट बँकिंग लॉगिन करायला लावून त्यांच्या नावे असलेली मुदत ठेव तोडण्यास लावली. सर्व रक्कम फिर्यादीच्या खात्यात जमा झाल्यानंतर बँकेतील कर्मचारी माहिती लिक करतील, आम्ही पोलीस आहोत, तुम्हाला काही होणार असे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपीने युपीआय, आयएमपीएस, धनादेशाद्वारे १७ लाख ३८ हजार ९८ रुपये घेत फसवणूक केली. आपली फसवणूक (Money laundering) झाल्याचे लक्षात आल्यानंतर सेलू पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोउपनि. सावंत करत आहेत.
ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले
तुमचे पार्सल आले आहे किंवा तुमचे वारंट निघाले आहे, असे म्हणत भामटे आम्ही पोलीस आहोत, असे सांगुन समोरील व्यक्तीचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर ऑनलाईन पध्दतीने तसेच धनादेशाद्वारे लाखो रुपयांची रक्कम उकळत फसवणूक केली जात आहे.