प्रा. लक्ष्मण हाके यांचा आरोप
औसा (OBC Elgar Melava) : कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणायचे हे आम्ही ठरवले असे सांगत मनोज जरांगे यांच्या कालच्या नारायणगडच्या सभेला खासदार शरद पवार, खासदार कल्याण काळे व खासदार संदिपान भुमरे यांच्याकडून पैसा पुरवला गेला, असा घणाघाती आरोप ओबीसीचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी केला.
औशात ओबीसी-वंचितांचा महाएल्गार मेळावा
औसा येथे मुक्तेश्र्वर मंगल कार्यालयात सकल ओबीसी, दलित, आदिवासी विमुक्त भटके, मुस्लिम समाजाचा महाएल्गार मेळावा रविवारी (दि.13) पार पडला. या मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि मुस्लिमचे नेते शब्बीर अन्सारी आणि प्रमुख पाहुणे म्हणून विमुक्त भटक्यांचे नेते हरिभाऊ गायकवाड, आदिवासी नेते रामराजे आत्राम, ओबीसी नेते ॲड. गोपाळ बुरबुरे, प्राचार्य एकनाथ पाटील, माळी समाजाचे नेते भारत काळे, पद्माकर वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ सुदर्शन बोराडे, राष्ट्रवादी राष्ट्रप्रेमी संघटनेचे मकबुल वलांडीकर, ओबीसी नेते दगडूसाहेब पडीले, लक्ष्मण पोटे, अनंत चौधरी हे विचार पीठावर उपस्थित होते.
नवनाथ आबा वाघमारे व शब्बीर अन्सारी यांनीही उत्सफूर्त असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अनील जाधव, अँड.शाम गोरे, शिवाजी कुंभार, नाना गुरव माळी, नितीन म्हेत्रे, रणधीर हाके, कृष्णा पांचाळ, पीयूषा म्हेत्रे, विशाल माळी, नितीन बंडगर व त्यांची टीम यांनी परिश्रम घेतले. मेळाव्याला हजारोच्या संख्येने ओबीसी, दलित, आदिवासी, विमुक्त भटके मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्यात बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, आतापर्यंत झालेल्या 29 मुख्यमंत्र्यांपैकी 22 मुख्यमंत्री मराठ्यांचे झाले. आता आदिवासी, दलित, आदिवासी, विमुक्त भटके, ओबीसी, मुस्लिम यांची वज्रमूठ बांधू या, मुख्यमंत्री, मंत्री आपले, राज्यात सत्ता आपली कायम येईल. मात्र आपण सर्व तनमनधनाने शक्ती एकवटली पाहिजे.