घोटाळ्यामुळे कृषी विभागात चांगलीच खळबळ!
नांदेड (Nanded) : जिल्ह्यातील मुखेड, कंधार, बिलोली व नायगाव तालुक्यातील कृषी अधिकारी व वितरकांच्या दुकानात सुक्ष्म सिंचन योजना सन 2021-22 व 2022-23 मधील ठिबक आणि तुषार संचाच्या संदर्भात 5 कोटी 98 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला असून, या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी (Nanded Rural Police) अनेक कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक (Agricultural Supervisor) व काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या घोटाळ्यामुळे कृषी विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सुक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत (Micro Irrigation Scheme) ठिबक आणि सिंचन योजना शासनाच्या (Government) वतीने राबविण्यात आली. या योजनेत मुखेड, कंधार, नायगाव व बिलोली तालुका कृषी कार्यालयातील (Agriculture Office) कृषी अधिकारी, पर्यवेक्षक व वितरकांनी शासनाची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा (Criminal Offence) दाखल करण्याबाबत लातूर विभागीय कृषी सहसंचालक यांनी सूचित केले होते. त्यानुसार पथकाने चौकशी केल्यानंतर, धर्माबादचे कृषी अधिकारी आर. जे. मरदोडे, मुखेडचे एस.डी. बनसोडे, एस. व्ही. दबडे मुखेड, आर. एम. पाटणकर मुखेड, तत्कालीन कृषी पर्यवेक्षक जे. डी. पवार मुखेड, कृषी पर्यवेक्षक एस. एच. कचकलवार मुखेड, तत्कालीन कृषी पर्यवेक्षक आर. जी. पवार लोहा, आर. पी. जाधव पूर्णा, एम. बी. बैस सेवानिवृत्त बिलोली, आर. जे. चव्हाण नायगाव, एच. पी. नव्हारे नायगाव, मुखेड ज्ञानेश्वरी कृषी सेवा केंद्र मुखेडचे ज्ञानेश्वर गुट्टे, वैष्णवी इरिगेशन मुखेडचे विष्णूकांत मुंडे, सुमित पाटील इरिगेशन कंधार येथील संजीव पवळे व लाभार्थी शेतकरी यांनी संगनमत करून 5 कोटी 98 लाख रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी तंत्र अधिकारी जिल्हा अधीक्षक एस. एस. स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो. नि. ओमकांत चिंचोलकर हे करत आहेत.
कृषी अधिकाऱ्यांसह 15 जणांविरुध्द गुन्हे दाखल!
तालुकास्तरावर असलेल्या कृषी अधिकारी (Agricultural Officer) व वितरकांच्या संगनमताने राज्यशासनास 5 कोटी 98 लाख रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणात कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी व काही सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांचा या अपहारात सहभाग असल्याचे उघड झाल्याने 15 जणांविरूध्द नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.




