गडचिरोली (Gadchiroli) :- जिल्ह्यात घातपाती कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या ५ जहाल नक्षल्यांच्या गडचिरोली पोलीसदल व सीआरपीएफने (CRPF) आज २० मे रोजी भामरागड (Bhamragad) तालुक्यातील बिनागुंडा परीसरातून मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये तिघांना अटक केली असून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
तिघांना अटक केली असून दोघांना चौकशीसाठी घेतले ताब्यात
अटक केलेल्या नक्षल्यामध्ये (Naxal) प्लाटून क्रमांक ३२ ची डीव्हीसीएम उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली (२८) रा. पल्ली, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.) , प्लाटुन क्रमांक ३२ ची पीपीसीएम पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी ( १९)रा. कोंचल, ता. आवापल्ली जि. बिजापूर (छ.ग.), प्लाटुन क्रमांक ३२ ची सदस्य देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (१९) रा. मारोट बाकापंचायत ता. आवापल्ली, जि. बिजापूर (छ.ग.) व इतर दोन जहाल नक्षल्यांचा समावेश आहे. यावेळी अटक करण्यात आलेल्या नक्षल्याकडून ०१ एसएलआर रायफल, ३०३ क्रमांकाची १ रायफल, ०३ सिंगल शॉट रायफल, ०२ भरमार बंदुका, ०३ वॉकीटॉकी व ईतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या सर्व नक्षल्यावर शासनाने ३६ लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते.
सर्व नक्षल्यावर शासनाने ३६ लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते
उपविभाग भामरागड अंतर्गत लाहेरी उपपोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या बिनागुंडा येथे ५० ते ६० च्या संख्येने नक्षली पोलीस जवानांवर हल्ला करुन घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्र जमले असल्याच्या गोपनिय माहितीवरुन पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस उप-अधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सि-६० ची ०८ पथके आणि सीआरपीएफच्या ३७ व्या बटालीयन ए कंपनीचे पथक रविवार दिनांक १८ मे रोजी बिनागुंडा जंगल परिसरात रवाना करण्यात आले होते. काल दिनांक १९ मे २०२५ रोजी सकाळी सि-६० पथके नक्षलविरोधी अभियान राबवित असताना बिनागुंडा गावाला शिताफीने घेराबंदी करुन गावामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली असता, काही हिरवे-काळे गणवेश परिधान केलेले व काही साध्या वेशातील हत्यारासह असलेले संशयीत व्यक्ती पोलीस पथकावर घातपात करण्याची योजना आखत असल्याचे दिसून आले.
परीसरात नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आले
गावामध्ये सामान्य नागरिक देखील असल्याने पोलीस पथकाने गोळीबार न करता अंत्यंत शिताफीने पाच नक्षल्यांना त्यांच्याकडील हत्यारासह ताब्यात घेतले. यावेळी इतर नक्षली गावाचा व जंगल परिसराचा फायदा घेत त्या ठिकाणावरुन पळून जाण्यास यशस्वी झाले. यावेळी अटक करण्यात आलेल्या नक्षल्याकडून ०१ एसएलआर रायफल, ३०३ रायफल १, ०३ सिंगल शॉट रायफल, ०२ भरमार बंदुका, ०३ वॉकीटॉकी व ईतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. तिघांना अटक करण्यात आली. इतर दोन नक्षल्यांच्या वयाबाबत ठोस पुरावा नसल्याने त्यांना बाल न्याय मंडळासमोर सादर करुन पुढील कार्यवाहीची तजवीज ठेवण्यात आली आहे. पोलीसांच्या अभिलेखावर दाखल गुन्ह्रांमध्ये त्यांचा सहभाग असल्याबाबत पडताळणी सुरु आहे. परीसरात नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.




