भिलेवाडा-खडकी मार्गाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप
खमारी/बुटी (Nitin Gadkari) : भीलेवाडा ते मांडवी ते करडी हा रस्ता अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. मोठ मोठे खड्डे प्रशासनाच्या व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेले आहेत. अनेक नागरिकांचे अपघात होऊन प्राण सुद्धा गेलेले आहेत. शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. रस्ता दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. परंतू बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाने ह्या मागणीकडे दुर्लक्ष केलेले आहे. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सार्वे यांनी आंदोलन उभारले होते. परंतू कारधा पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी प्रभाकर सार्वे यांना पहाटे घरूनच अटक केली व कारधा पोलीस स्टेशन येथे त्यांना ठेवण्यात आलेले आहे.
केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे दि.५ जुलै रोजी भंडारा जिल्ह्यात येत आहेत. प्रशासनाचे लक्ष समस्येकडे वेधण्यासाठी मांडवी गावचे सरपंच प्रभाकर सार्वे यांनी नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या अडवण्याची घोषणा केली होती. परंतू कारधा पोलिसांनी जोर जबरदस्तीने व दडपणशाहीचे धोरण अवलंबून प्रभाकर सार्वे यांना पहाटेच मांडवी गावातून घरून अटक केली. त्यांच्यासोबतच्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरी सकाळीच दस्तक देण्यात आली, ही विशेष…
स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व मांडवी ह्या गावचे उपसरपंच प्रभाकर सार्वे हे रस्ता दुरुस्तीसाठी शासन दरबारी अनेक चकरा मारत आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांची प्रमुख मागणी होती की, सदर रस्ता अत्यंत खराब झाला असून हजारो नागरिक, विद्यार्थी व महिला या रस्त्याने जाणे-येणे करतात. परंतू या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले.
आंदोलन करणे हा भारतीयांचा अधिकार आहे. परंतू मला घरून अटक करून जिल्हा प्रशासनाने दडपशाहीचे धोरण अवलंबून लोकशाहीची हत्या केली आहे. मागील अनेक वर्षांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहेत. परंतू प्रशासन कुंभकर्णी झोपेत निद्रिस्त झाले आहे, असा आरोप प्रभाकर सार्वे यांनी केला आहे. प्रभाकर सार्वे यांनी आरोप केलेला आहे की काल रात्रीपासूनच पोलिसांच्या ससेमीरा माझ्या पाठीमागे लावण्यात आला. माझ्या कुटुंबातील सदस्यांना व मला पोलिसांनी नाहक त्रास दिलेला आहे.
सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. रस्ता दुरुस्त करण्याचे काम करणे सोडून आंदोलन करणार्यांना अटक करून प्रशासन काय साध्य करत आहे? हा एक यक्षप्रश्न या घटनेच्या निमित्ताने निर्माण झाला आहे. सदर रस्ता जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन असे सुरू ठेवणार असल्याचे प्रभाकर सार्वे यांनी म्हटले आहे.




