उपसभापती सुभाष बोरकर यांची प्रशासनावर टीकेची झोड
कठोर कारवाईची मागणी
कठोर कारवाईची मागणी
हरदोली/सिहोरा (Sihora Sand Mafia) : सिहोरा परिसरामध्ये विना-नंबर प्लेट ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळूची वाहतूक राजरोसपणे सुरू असून, याकडे शासन आणि प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘वाळू माफिया’ नव्हे, तर ‘प्रशासन-माफिया’ यांचाच हा गठ्ठा असल्याचा आरोप आता थेट लोकप्रतिनिधींकडून होत आहे.
सिहोरा परिसरात नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. विशेष म्हणजे, या (Sihora Sand Mafia) वाळूची वाहतूक करणारे बहुतांश ट्रॅक्टर हे विना-नंबर प्लेट आहेत. यामुळे अपघाताची किंवा इतर कायदेशीर कारवाईची वेळ आल्यास ट्रॅक्टर मालक आणि चालकांना ओळखणे प्रशासनाला शक्य होत नाही. प्रशासनाच्या या बोटचेपेपणामुळे वाळू माफियांचे धाडस वाढले असून, त्यांनी परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
उपसभापती बोरकर आक्रमक
या गंभीर प्रकाराची दखल घेत तुमसर पंचायत समितीचे उपसभापती सुभाष बोरकर यांनी प्रशासनावर कठोर शब्दांत टीका केली आहे. ‘प्रशासनाच्या डोळ्यांदेखत विना-नंबर प्लेट ट्रॅक्टर सर्रास रेतीची वाहतूक करत आहेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, वाळू माफियांना प्रशासकीय अभय मिळत आहे. जर कारवाईची मागणी करूनही महसूल आणि पोलीस प्रशासन ‘अर्थपूर्ण’ संबंधातून याकडे दुर्लक्ष करत असेल, तर हा शासकीय महसुलाचा बुडवणूक आणि संघटित गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्याचा प्रकार आहे. (Sihora Sand Mafia) सामान्य जनतेला कायद्याचे नियम, आणि माफियांना सूट, हे चालणार नाही!’ असे बोरकर यांनी ठणकावून सांगितले.
कठोर कारवाईची मागणी
उपसभापती बोरकर यांनी तातडीने या सर्व विना-नंबर प्लेट ट्रॅक्टरवर कठोर कारवाई करावी, तसेच या अवैध धंद्यात सामील असलेल्या जबाबदार शासकीय कर्मचार्यांची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने त्वरित पाऊले न उचलल्यास जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नागरिकांमध्ये संताप
अवैध वाळू उपशामुळे नदीचे पात्र खोल झाले असून, परिसरातील पाणी पातळी खालावत आहे. त्यातच, (Sihora Sand Mafia) ट्रॅक्टरमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या सुस्तीमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.