उपविभागीय कार्यालय व नांदेड तहसील कार्यालयाचा उपक्रम!
नांदेड (Nomadic Tribes) : छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवाडा’ निमित्त नांदेड आणि अर्धापूर तालुक्यातील भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध दाखले वाटपाचा कार्यक्रम १ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि नांदेड तहसील कार्यालयाच्या (Nanded Tehsil Office) वतीने आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे आयोजन उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
उपक्रमाचा एक भाग म्हणून कार्यक्रम आयोजित!
छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत उपविभागीय कार्यालय, नांदेड आणि तहसील कार्यालय, नांदेड यांच्या वतीने नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करून त्यांना आवश्यक असलेले विविध दाखले देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
१५० नागरिकांची उपस्थितीत!
या कार्यक्रमात भटक्या विमुक्त जातीचे नेते देविदास हादवे यांनी समाजाच्या विविध समस्या आणि अडचणी मांडल्या. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, रहिवासी दाखला आणि इतर आवश्यक दाखले वाटप करण्यात आले. यामध्ये वासुदेव, मसणजोगी, मुस्लिम मदारी, गाडी वडार, वाघे, गोसावी आणि गोंधळी समाजातील (Society) जवळपास १५० नागरिकांची उपस्थितीत होती.
मान्यवर उपस्थित!
यावेळी, समाजातील वंचित घटकांसाठी ‘सेतू’ मार्फत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नांदेड शहरातील सेतू केंद्र चालक विजय जोंधळे आणि अर्धापूरचे शिवप्रसाद पत्रे यांचा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. वाडी तांड्यावरील व वस्तीबाहेर राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातीना शासनाच्या विविध योजना लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. सचिन खल्लाळ यांनी सांगितले. या कार्यक्रमाला परभणीचे जिल्हा कोषागार अधिकारी निळकंठ पांचगे, नायब तहसीलदार संजय नागमवाड, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार, पुरवठा निरीक्षक रवींद्र राठोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.