Ghatanji :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी ट्विटर (आताचे एक्स)वर आक्षेपार्ह रिट्विट केल्याच्या प्रकरणात घाटंजी येथील सुवर्ण व्यापारी शैलेश नंदकिशोर वर्मा (४७) यांना पुणे गुन्हे शाखेच्या सायबर सेलने अटक केली आहे. ही कारवाई १५ जुलै रोजी दुपारी घाटंजी येथे करण्यात आली.
पुणे क्राइम ब्रॅचची घाटंजीत कारवाई; व्यापारी वर्तुळात खळबळ
या प्रकरणी पुणे सायबर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता कलम ७५(१)(४), ३(५), ३५६(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. शैलेश वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंट (Twitter account) वरून अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेले ट्विट रिट्विट केले होते. नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले असले, तरी त्या रिट्विटवरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शैलेश वर्मा यांनी अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
मात्र, १७ मे २०२५ रोजी न्यायालयाने(court) त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर पुणे सायबर पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घाटंजीत येऊन वर्मा यांना घाटंजी पोलीस ठाण्यात बोलावून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुणे येथे हलवण्यात आले. पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यास नकार देण्यात आला असला तरी, संशयितास पुणे घेऊन जाण्याबाबतचे सूचना पत्र घाटंजीतील एका फर्निचर विक्रेत्यास देण्यात आले आहे.