परभणी (Parbhani) :- हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Samruddhi highway) जोडणाऱ्या जालना – नांदेड या द्रुतगती महामार्गाचा अद्याप पर्यंत कोणताही मोबदला मिळाला नसल्याने तालुक्यातील करडगाव येथील बाधित ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवार २४ रोजी निवेदन दिल्यानंतर शनिवार २५ जानेवारी पासून मौजे करडगावात महिलांसह ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले आहेत.
मोबदला मिळेपर्यंत करणार उपोषण..
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना – नांदेड या द्रुतगती मार्गात तालुक्यातील करडगाव ,टाकळी कुंभकर्ण, धार पांढरी ,समसापूर ,करडगाव या गावातील शेतकरी बाधित आहेत. सदरील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आक्षेप अर्ज देऊनही अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकार ची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याने सदरील गावातील शेतकरी शनिवार २५ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्यात सन २०१३ च्या कायद्याप्रमाणे आमचे भूसंपादन करावे. तात्काळ अवॉर्ड देण्यात यावे, तोपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी शेतात येऊ नये, तसेच बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकास शासकीय नोकरीत घ्यावे.
याप्रमाणेच जमिनीचा मोबदला मिळेपर्यंत आम्ही ग्रामस्थ उपोषणास बसणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनावर करडगाव येथील मारोती मुंढे ,बाळासाहेब मुंढे, गजानन मुंढे, गणेश मुंढे, संताबाई भरोसे, अनंत मुंढे, संजय लांबाडे,गजानन पुरणवाड, संतोष पुरणवाड, वैभव देशमुख आदींच्या स्वाक्षरी आहेत..