लातूर (Latur):- खासदार फंडातून एक लाख सॅनिटरी नॅपकिनचे(Sanitary Napkin) वाटप करणार, अशी घोषणा खासदार डाॕ. शिवाजी काळगे यांनी केली. महिला बचत गटांना कार्यालय बांधण्यासाठी महिलांना निधीची आवश्यकता आहे. मी व्यवसायाने डॉक्टर आहे. या परिसरातल्या महिलांचे आरोग्यासाठी ज्या-ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण करु, अशी ग्वाही डॉ. काळगे यांनी दिली.
लातूरच्या डाॕक्टर खासदारांकडून घोषणा
उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालूका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, लातूर अंतर्गत समृध्दी महिला प्रभाग संघ भातांगळी ता. जि. लातूर यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिंदगीहाळ येथे सत्कारप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्य कृषी मुल्य आयोग (State Agricultural Value Commission)आणि मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल होते. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेश सचिव अभय साळुंके, संतोष देशमुख, कल्पना क्षीरसागर (हनुमान उच्च माध्यमिक शैक्षणिक संस्था), बिंदगीहाळच्या सरपंच पुनम कांबळे आणि राजकुमार पाटील, ज्योती शिंदे उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात पाशा पटेल म्हणाले, या परिसरातल्या महिलांनी एक मागणी केली होती की आमच्या चार हजार महिला सदस्य आहेत. चार हजार महिला सदस्यांना वर्षभर काम मिळत नाही. हा धागा धरून पाशा पटेल यांनी सांगितले की, सेंद्रिय मालापासून राळा, भुरका, सावा, भगर आणि नाचणी हे जे विविध पदार्थ करून जगभरातल्या लोकांना खाऊ घालायचं काम फिनिक्स फाउंडेशन लोदगाचे वतीने लवकरच सुरू केले जाणार आहे. 4000 महिलांना रात्रंदिवस काम मिळवून दिले जाईल, असे पटेल म्हणाले.
भरड धान्यापासून तयार केले अन्नपदार्थ
समृध्दी महिला प्रभाग संघ भातांगळी मार्फत ज्योती शिंदे यांनी महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ग्रामीण पातळीवर सोडवत सॅनिटरी नॅपकिन चा उद्योग उभारला आहे. मायक्रो मिलेट साठी त्यांनी सी.एफ.टी.आर.आय. मध्ये प्रशिक्षण घेऊन राळा, भुरका, सावा, भगर आणि नाचणी पासून पदार्थ निर्मिती केली असून नुकतेच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात तीन दिवस-रात्र मेहनत करून सर्व लोकप्रतिनिधींना भरड धान्यापासून तयार केलेली अन्नपदार्थ खाऊ घातले होते.