एक रुपया भिक मागून प्रशासनाचे लक्ष वेधले
-सुधिर गोमासे
तुमसर (Paraswada upSarpanch) : तालुक्यातील परसवाडा (देव्हाडी) येथील २० वर्षांपासून अर्थातच दोन दशकापासून पाणी पुरवठा योजना ठप्प असून महाराष्ट्र जल प्रादेशिकरण ही योजना कासव गतीने सुरू आहे. गावात पाण्याची टाकी शोभेची वस्तू बनली आहे. याठिकाणी पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकार्यांनी व कंत्राटदाराने या योजनेच्या माध्यमातून मलाई खाल्ली. २०१८-२०१९ च्या दरम्यान तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना सुद्धा पत्रव्यवहार केले होते.
त्यादरम्यान काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र जल प्रादेशिकरण तुमसर तालुक्यातील परसवाडा देव्हाडी, हसारा, खापा, ढोरवाडा व स्टेशनटोली हे पाच गाव जलजीवन मिशनमध्ये हस्तांतरित केले असता घराघरापर्यंत नळ गेले पण नळाला अजूनपर्यंत एकही थेंब पाणी मिळाले नाही. व येथील पाणीपुरवठा निधी अभावी बंद करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला खूप पत्रव्यवहार करण्यात आले तरी कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.
परसवाडा गावातील उपसरपंच पवन खवास (Paraswada upSarpanch) यांनी सोमवारी शासनाच्या जलनीतीविरोधात थेट आणि अनोखे आंदोलन करून तहसील कार्यालयात खळबळ उडवली. त्यांनी तुमसर येथील उपविभागीय अधिकारी काश्मिरा सांखे, खंडविकास अधिकारी, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण व जि.प सदस्य यांच्या दालनात ‘भीकेचा कटोरा’ समोर धरून, ‘मला एक रुपये द्या’ अशी मागणी करत शासनाच्या धोरणांवर ताशेरे ओढले.
खवास (Paraswada upSarpanch) म्हणाले, ‘गावासाठी मी अनेक आंदोलनं केली आणि अखेर नळयोजना आणली. पण शासनाकडे निधी नसल्याचे कारण देत भर पावसातच योजना बंद केली गेली. एकीकडे शासन ‘लाडकी बहीण’ म्हणते, पण खरी बहीण तहानलेली आहे. तिची तहान कधी भागणार?’ अशा शब्दांत त्यांनी शासनाच्या दुटप्पी भूमिकेवर घणाघाती प्रहार केला. फक्त परसवाडाच नव्हे तर तालुक्यातील तुडका, तामसवाडी, ढोरवाडा देव्हाडी, हसारा, खापा, स्टेशन टोली यांसारख्या गावांमध्येही तीव्र पाणीटंचाई असल्याचे खवास यांनी निदर्शनास आणले. तसेच, ‘मी प्रत्येक शासकीय विभागाकडून एक-एक रुपया भीक मागून जमा झालेली रक्कम महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांना सोपवली आहे,’ असे म्हटले.
या आंदोलनामुळे तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय,पंचायत समिती कार्यालात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र उपविभागीय अधिकारी काश्मिरा सांखे व महाराष्ट्र जिवन प्राधिकरण अधिकारी यांनी खवास यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व ‘या संदर्भात लेखी निवेदन द्या. आम्ही शासनाकडे पाठवून पुढील कार्यवाही करू,’ असे आश्वासन दिले. दरम्यान, पावसाळ्यातच अशी बिकट पाणीटंचाई जाणवू लागल्याने येणार्या उन्हाळ्यात स्थिती किती गंभीर बनेल याची धास्ती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.