परभणी (Parbhani Heavy Rain) : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Parbhani Heavy Rain) प्राथमिक अंदाजानूसार २ लाख ९८ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाल्यामुळे पिके भूईसपाट झाली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ५२ महसुल मंडळापैकी ५२ मध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामध्ये मोठया प्रमाणात सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडिद सह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा प्राथमिक अहवाल कृषि कार्यालयाकडून जिल्हाधिकार्यांना सादर केला आहे. यामध्ये ३१ ऑगस्ट ते १ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या क्षेत्राची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात खरीप २०२४च्या हंगामात ५ लाख ७ हजार ७०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी २ लाख ९८ हजार ३५६ हेक्टर क्षेत्रावरील पिके भूईसपाट झाली आहेत. कृषी अधिक्षक कार्यालयाच्या प्राथमिक अहवालानंतर प्रत्येक्षात पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे. त्यानूसार जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन कामाला लागली आहे. पंचनाम्यानंतर प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या अहवालानूसार शेतकर्यांना मदत देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील या (Heavy Rain) बाधित क्षेत्रामध्ये पेरणी झालेल्या परभणी तालुक्यातील ८३ हजार ८९ क्षेत्रापैकी ६२ हजार ३१६, गंगाखेड तालुक्यातील ५८ हजार ४०० क्षेत्रापैकी २७ हजार, सोनपेठ तालुक्यातील ३४ हजार ९८८ क्षेत्रापैकी १६ हजार ८१, पालम तालुक्यातील ४५ हजार ४७० क्षेत्रापैकी २९ हजार ९४०, पाथरी तालुक्यातील ४३ हजार ४७९ क्षेत्रापैकी ३२ हजार ६१०, मानवत तालुक्यातील ४३ हजार ५२५ क्षेत्रापैकी २६ हजार ११५, जिंतूर तालुक्यातील ८४ हजार ४७९ क्षेत्रापैकी ३९ हजार ४८९, पूर्णा तालुक्यातील ५१ हजार २९२ क्षेत्रापैकी २७ हजार ५९५ तर सेलू तालुक्यातील ६२ हजार ९७९ क्षेत्रापैकी ३७ हजार २१० क्षेत्र बाधित झाल्यामुळे पिके भूईसपाट होत नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानूसार हे क्षेत्र असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
बुधवारी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांना नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्यांना आवश्यक ती मदत देण्याचे आदेश दिले.
प्राथमिक अंदाजाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता
मागील दोन ते तिन दिवसात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसात झालेल्या बाधित क्षेत्राचा प्राथमिक अंदाज कृषी कार्यालयाने जिल्हाधिकार्यांना सादर केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यात झालेल्या सर्वच महसुल मंडळात झालेल्या (Heavy Rain) अतिवृष्टीमुळे वाढ होण्याची शक्यता आहे.




