परभणी (Parbhani Theft) : पाथरी तालुक्यातील उमरा गावामध्ये शनिवारी दुपारी भरदिवसा चोरीची घटना घडली आहे. ग्रामस्थ बालासाहेब कोल्हे यांच्या घरात घडलेल्या या चोरीत चोरट्याने तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
शनिवार २१ जुन रोजी दुपारी ५ च्या सुमारास कोल्हे यांचे कुटुंब वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे (Parbhani Theft) चोरट्यांनी ही संधी साधून चोरी केली. बालासाहेब कोल्हे हे शेतामध्ये गेले असताना त्यांची पत्नी व आई घराच्या दुसऱ्या मजल्यावर घरकाम करत होत्या. याच वेळी तळमजल्यावरील कपाटातील मिनी गंठण, झुंबर, अंगठी, वेल आणि कानातली असा अंदाजे तीन तोळ्यांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला.
विशेष म्हणजे कोल्हे यांच्या पत्नीने चोरी (Parbhani Theft) होत असल्याचे लक्षात आल्याने चोरट्याला पाहिले होते, यावेळी त्यांनी आरडाओरड केली. ग्रामस्थ घटनास्थळी येईपर्यंत चोर सोन्यासह पळून गेला. दरम्यान उमरा गावात मागील काही दिवसांपासून संध्याकाळच्या सुमारास संशयास्पद हालचाली दिसून येत होत्या. त्यामुळे ग्रामस्थ सतर्क राहून रात्रभर गस्त घालत होते. मात्र चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोरी करून ग्रामस्थांनाही गाफील ठेवले.
घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले असून अधिक तपास पोलीस नाईक सुरेश कदम करीत आहेत.




 
			 
		

