बारा तासात गुन्ह्याची उकल; तरुणीवर अत्याचार करणारे नराधम गजाआड
परभणी (Jintoor Gang Rape) : जिंतूर तालुक्यातील कोणत्याही प्रकारची तक्रार नसताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन घटनेची पडताळणी करत जिंतूर पोलिसांनी तरुणीवरील सामुहिक अत्याचाराच्या प्रकरणाचा उलगडा केला आहे. नराधम आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अवघ्या बारा तासात जिंतूर पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला. आरोपींना रविवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास परभणी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. जिंतूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत वरिष्ठांना माहिती देऊन तात्काळ हालचाल केली.
या (Jintoor Gang Rape) घटनेविषयी अधिक माहिती अशी की, जिंतूर तालुक्यातील भोगावदेवी संस्थान इटोली शिवारात एका १८ वर्षीय तरुणीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली होती. सुरुवातीला सदर प्रकरणात कोणतीही तक्रार झाली नाही. मात्र या प्रकरणाची चर्चा सुरु झाली. गोपणीय बातमीदारामार्फत जिंतूर पोलिसांना माहिती मिळाली.
पोलिसांनी थोडाही वेळ न घालता कोणतीही तक्रार नसताना आरोपींचा शोध सुरु केला. आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या घटनेविषयी सखोल माहिती अशी की, मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी एक तरुणी आणि तिचा मित्र भोगावदेवी संस्थानच्या इटोली शिवारात झाडाखाली गप्पा मारत बसलेले असताना काही विकृत मनोवृत्तीच्या तरुणांनी त्या दोघांना एकांतात पाहुन संगणमताने तरुणीवर अत्याचार केला. तरुणीजवळील रोकड काढून घेतली. इतकेच नव्हे तर कृत्याची आरोपींनी व्हिडीओ चित्रफित तयार करुन त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर या प्रकरणात करण मोहिते, साबेर सत्तार कुरेशी, शेषेराव दत्तराव शेवाळे या तिघांना अटक करण्यात आली. चित्रफित तयार करणार्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. जिंतूर पोलिसात पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरुन १९ ऑक्टोबर रोजी करण, शेषेराव, साबेर, मुन्या, अर्जुन, लखन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एक विधी संघर्ष बालक देखील आहे.
यांच्या पथकाने आरोपींना केले गजाआड
तरुणीवरील सामुहिक अत्याचाराचे (Jintoor Gang Rape) प्रकरण पुढे आल्यानंतर पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ यांनी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी जीवन बेनीवाल यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली. पो.नि. गजेंद्र सरोदे, स्थागुशाचे पो.नि. विवेकानंद पाटील, सपोनि. बालाजी पुंड, पोलिस अंमलदार गुंगाणे, वाघमारे, जीया खान, माणिक डुकरे, राम पौळ, नामदेव डुबे, मुकेश बुधवंत, पांडूरंग तुपसुंदर, सिध्देश्वर चाटे, सपोनि. कावळे, पुंगळे यांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले.
पिडीतेला पोलिस अधिक्षकांनी दिला धीर
सामुहिक अत्याचाराची घटना (Jintoor Gang Rape) पुढे आल्यानंतर पिडीतेचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी तिला विश्वासात घेतले. भय, धक्का आणि दु:खामुळे पिडीतेने मौन बाळगले. पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी स्वत: पिडीतेचे समुपदेशन करत तिला विश्वास दिला. त्यानंतर पिडीता बोलती झाली. तिने घडला प्रकार सांगितला.




