जिल्हा न्यायाधीशांनी सुनावली शिक्षा!
परभणी (Parbhani) : घरामध्ये कुत्रा शिरला असताना त्या कुत्र्याला का दगड मारला म्हणून सेवक नगर मध्ये एकास पाच वर्षांपूर्वी चाकूने भोसकले होते. या प्रकरणात आरोपीला तीन वर्षाचा सश्रम कारावास व तीस हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाचे (District Sessions Court) न्यायाधीश ए. ए. शेख यांनी दिली आहे.
परभणी शहरातील सेवक नगर येथे 31 मे 2020 रोजी भांडणांमध्ये एकास चाकुने भोसकले होते. या प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाण्यात (Nanalpeth Police Station) आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी मुंजाजी घोडके यांनी आपल्या घरात आलेले कुत्र्याचे पिल्लू बाहेर हाकलण्यासाठी दगड मारला. कुत्र्याला का दगड मारला म्हणून आरोपी चंदन सागर सोळंकी याने मुंजाजी घोडके यास जाब विचारला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर चंदन याने मुंजाजी यास चाकूने भोसकले.
परभणीतील सेवक नगर येथील घटना!
या घटनेनंतर सायंकाळी सात वाजता नानलपेठ पोलीस ठाण्यात आरोपी चंदन सोळंकी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोउपनि. साईनाथ पुयड यांनी केला. न्यायालयामध्ये प्रकरणाची सुनावणी घेताना सात साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये जखमी व वैद्यकीय साक्ष (Medical Testimony) महत्त्वाची ठरली. जिल्हा न्यायाधीश ए. ए. शेख यांनी साक्षीदारांच्या तपासणीनंतर आरोपी चंदन सोळंकी यास जबाबदार धरून त्यास तीन वर्ष सश्रम करावास व तीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास परत सहा महिन्याचा साधा कारावास द्यावा असेही सांगितले. सरकारी अभियोक्ता (Public Prosecutor) अॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. नितीन खळीकर यांनी या प्रकरणात सरकारी (Government) पक्षाची बाजू मांडली. तर पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि. सुरेश चव्हाण, बाबू हिमगिरे, अंमलदार दत्तराव खुणे, प्रमोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.




 
			 
		
