ढगफुटी पावसाने खरिपाचे मोठे नुकसान!
गावोगावी घरात पाणी, वाहतूक ठप्प
परभणी (Pathari Heavy Rain) : पाथरी तालुक्यात सोमवारी सकाळी सहा ते आठ या दोन तासांत पाथरी तालुक्यात ढगफुटी पावसाने हाहाकार माजवला. विटा, मुद्दगल, लिंबा, वाघाळा, फुलारवाडी, बाभळगाव, तुरा, गोंडगाव, उमरा, गुंज, लोणी, अंधापुरी, कानसूर, टाकळगव्हाण, सारोळा आदी गावांसह तालुक्यातील चारही महसूल मंडळांत हा (Pathari Heavy Rain) पाऊस झाला. यामुळे हातात आलेले कापूस व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू भिजल्या.
वाघाळा गावातील बसस्थानक शेजारील इंदिरानगर येथे (Pathari Heavy Rain) पुराचे पाणी घरात घुसल्यानंतर नागरिकांना शाळेत तात्पुरती निवास व्यवस्था करून ग्रामपंचायतीतर्फे जेवणाची सोय करण्यात आली. दरम्यान, मराठवाड्यातील पावसामुळे जायकवाडी व सिंदफणा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने गोदावरी नदीला प्रचंड पूर आला आहे. रविवारी रात्री १ लाख ७६ हजार क्युसेक विसर्ग सुरू असताना सोमवार १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता ६७ हजार ८०० क्युसेक विसर्ग सुरू होता, अशी माहिती मिळाली आहे.
सोमवारी सकाळी सहा ते दुपारी एक या काळात जनजीवन विस्कळीत झाले. (Pathari Heavy Rain) नदी-नाल्यांना पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला. राष्ट्रीय महामार्ग ५४८ ब सकाळपासून बंद झाला होता. ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी वाहतूक सुरळीत झाली असली तरी गोदावरी नदीपात्रातील वाढता विसर्ग चिंतेचा विषय ठरत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, असा पाऊस मागील अनेक वर्षांत झाला नव्हता. झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांमध्ये तातडीने नुकसानभरपाईची मागणी होत आहे.