ऐन हिवाळ्यात पाथरीत राजकीय वातावरण तापले
बड्या नेत्याला पक्ष प्रवेश देण्याचे दिले संकेत
परभणी/पाथरी (Pathari Mahayuti) : विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधात निवडणुक लढविणार्या व्यक्तीला तुम्ही शिवसेनेत पुन्हा प्रवेश कसा दिला? असा सवाल करत आ. राजेश विटेकर यांनी पाथरीत तीव्र नाराजी व्यक्त केली. तुम्ही सुरुवात केली, आता आम्हीही काही जणांना आमच्या पक्षात सन्मानपूर्वक प्रवेश देऊ असे म्हणत पाथरीतील एका ज्येष्ठ नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट प्रवेशाचे संकेत दिले. आ. विटेकर यांनी जिल्ह्यातील (Pathari Mahayuti) महायुती पदाधिकार्यांमध्ये स्थानिक पक्ष प्रवेश देताना समन्वयाची भूमिका असावी असे म्हणत दहा मिनिटे या विषयावर वक्तव्य केले. यानंतर आता पाथरीतील राजकीय वातावरण ऐन हिवाळ्यात तापणार असल्याचे दिसत आहे.
शुक्रवार १० जानेवारी रोजी (Pathari Mahayuti) पाथरी शहरात महायुती उमेदवारांच्या नागरी सन्मानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आ. राजेश विटेकर बोलत होते. तरुण राजकारणी सईद खान यांच्या नावाचा उल्लेख टाळून महायुतीतील घटक पक्ष असणार्या शिवसेनेमध्ये त्यांना देण्यात आलेल्या प्रवेशावरुन संताप व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत महायुती सोडून रासपकडून निवडणुक लढवत प्रचारा दरम्यान खान यांनी केलेल्या टिकेचा आ. विटेकरांनी समाचार घेतला. कालचा पोरगा माझ्यावर टिका करायलाय, रडायलाय का ? म्हणत पाठीत खंजीर खुपसला, अशा प्रकारची टिका केल्याची आठवण करुन दिली. विधान परिषदेचा आमदार झाल्यानंतर करण्यात आलेल्या सत्कारावेळी पाथरी विधानसभा उमेदवारी संदर्भात शब्द दिला नव्हता अशी आठवण करुन दिली.
महायुती ज्यांना जागा सोडेल त्यांचे काम करणार असा शब्द दिल्याचे सांगितले. घानेरडे राजकारण करत नाही, त्यांना (Pathari Mahayuti) महायुती मध्ये घेऊन आम्हाला संघर्षाची वेळ आणु नये असे आ. विटेकर म्हणाले. यावेळी मंचावर उपस्थित असणारे माजी आ. हरिभाऊ लहाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे यांच्याकडे तुमच्या पक्ष नेतृत्वाने पदाधिकार्यांना विचारणा करायला हवी होती अशी तक्रार केली. आम्हीही काही जणांना आमच्या पक्षात सन्मानपूर्वक पक्ष प्रवेश देऊ असे म्हणत पाथरीत माजी आ. दुर्राणी यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाण्याच्या दबक्या आवाजातील चर्चेला एकप्रकारे दुजोरा दिला.
तसेच मानसन्मान न देणार्या व पैशाचा माज असणार्या व्यक्तीचा पैशाचा माज जिरवणार असा इशाराही आ. विटेकर यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्याचा इरादा बोलुन दाखविला. तसेच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी (Pathari Mahayuti) महायुती मधील पक्षांच्या पदाधिकार्यांमध्ये समन्वय ठेवत पक्ष प्रवेशाचे निर्णय घ्यावेत अशी विनंती केली. आ. राजेश विटेकर यांनी सार्वजनिक ठिकाणी संताप व्यक्त केल्याने येत्या काळात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.