-ब्रम्हदास बागडे
पवनी (Pauni Water Supply) : शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना (Pauni Water Supply) पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे लागत आहे. नवीन योजना दोषपूर्ण, जुनी योजना ठप्प आणि प्रशासन सुस्त–अशी भीषण अवस्था शहरात निर्माण झाली आहे. दररोज पाण्यासाठी होणारी धावपळ, कोरडे नळ आणि वाहणारे पाणी पाहून नागरिकांचा संयम सुटत चालला आहे.
वारंवार पाणीपुरवठा बंद – तहानलेले नागरिक, ओले रस्ते, कधी ट्रान्सफॉर्मर बिघडतो, कधी लाईन फुटते, कधी वीज नसते, तर कधी पुरवठ्याचे वेळापत्रकच धूसर असते. या सततच्या विस्कळीततेमुळे शहरातील (Pauni Water Supply) पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. एकीकडे नळ कोरडे, तर दुसरीकडे नळाला तोट्या नसल्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहते. ही केवळ प्रशासकीय अकार्यक्षमता नसून जनतेच्या पैशांची उधळपट व मूलभूत हक्कांचा अपमान आहे.
पवनी शहरातील पाणीपुरवठा (Pauni Water Supply) समस्या केवळ तांत्रिक किंवा प्रशासनिक नसून ती राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे निर्माण झालेली आपत्ती आहे. नागरिकांना तहान लागते तेव्हा त्यांना आश्वासन नव्हे, तर पाण्याची गरज असते. आता तरी प्रशासन, महावितरण आणि लोकप्रतिनिधींनी जागे होऊन सुस्पष्ट, शाश्वत व दोषमुक्त पाणीपुरवठ्याची हमी द्यावी, अशी ठाम मागणी जनतेकडून होत आहे. पाणी हा मूलभूत अधिकार असून त्याची पूर्तता करणे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे. हा अधिकार डावलला जात असेल, तर लोकशाहीचा अर्थच नाही, असे संतप्त मत नागरिकांमध्ये उमटत आहे.
ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे जुनी योजना बंद
नवीन पाणीपुरवठा (Pauni Water Supply) पाईप लाईन फुटल्यामुळे ३० जून रोजी जुन्या पाईप लाईन वरून तात्पुरता पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र १ जुलै रोजी जुनी पाणीपुरवठा योजनेचा ट्रान्सफॉर्मर अचानक बिघडला. त्यामुळे पर्यायी स्वरूपात होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला. नगर परिषदेकडून महावितरण कंपनीला ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी विनंती करण्यात आली. २ जुलै रोजी कारधा उपकेंद्रावरून ट्रान्सफॉर्मर मागवण्यात आला असून ३ जुलै रोजी बसवण्याची शक्यता आहे. तोपर्यंत पाणीपुरवठा बंदच राहणार आहे.
नवीन योजना दोषांनी भरलेली
नवीन योजनेतील (Pauni Water Supply) पाईप लाईन फुटते, टाकी गळते, जलशुद्धीकरण केंद्राची इमारत ओलसर आहे, अनेक भागांत नळांना तोट्या नाहीत, तर ५०४ नळधारकांची जोडणीच आजतागायत केली नाही. कमी खोलीवर आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्याने टाकलेली पाईप लाईन वारंवार फुटते, लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहते, आणि नागरिक तहानलेलेच राहतात.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा उदासीनपणा
या गंभीर समस्यांवर ना नगर परिषद ठोस पावले उचलते, ना जिल्हा प्रशासन तत्काळ दखल घेते. सर्व यंत्रणा ‘तपास सुरू आहे’ अशा औपचारिक उत्तरात अडकलेली आहे. लोकप्रतिनिधी, पक्षपदाधिकारी यांना ही नागरिकांची तहान दिसतच नाही की काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. (Pauni Water Supply) पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत गरजेच्या प्रश्नावर आवाज उठवण्याचे नैतिक आणि सामाजिक दायित्व स्थानिक लोकप्रतिनिधींनी पार पाडले पाहिजे. मात्र तेही गप्पच आहेत.




