अधिकाऱ्यांना देता आली नाही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे
कळमनुरी (Meghna Bordikar) : कळमनुरी तालुक्यातील सर्वच शासकीय विभागात नियोजना अभावी शासनाच्या विविध योजनेचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळत नसल्याने ना. मेघनाताई बोर्डीकर (Meghna Bordikar) चांगल्याच संतापल्या होत्या त्यानंतर विभागातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली व यानंतर पुन्हा बैठक घेऊन सर्व बाबींचा आढावा घेणार असून तोपर्यंत कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या व पुढील काळात सुधारणा न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची तंबी सर्व विभाग प्रमुख यांना दिली.
ना.मेघनाताई बोर्डीकर (Meghna Bordikar) यांच्या प्रमुख उपस्थितीत १३ ऑगस्ट रोजी कळमनुरी उपविभागीय कार्यालयात सर्व शासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, माजी आमदार गजाननराव घुगे, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे, गटविकास अधिकारी अमितकुमार मुंडे, यांच्यासह शासकीय विभागातील सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
ना.मेघनाताई बोर्डीकर (Meghna Bordikar) ह्या सर्वच विभाग प्रमुखांमार्फत शासकीय योजनांचा आढावा घेत असताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अधिकाऱ्यांना उत्तरेही देता आली नाही यामुळे मेघनाताई बोर्डीकर चांगलेच संतापल्या होत्या यात ग्रामीण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील क्षय रोग बाधित रुग्णांची माहिती घेत असताना यावर ग्रामीण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या तसेच जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात होत असलेल्या कामाविषयी आढावा घेत असताना अनेक कामे पूर्ण झाले नसल्याचे ना.बोर्डीकर (Meghna Bordikar) यांच्या लक्षात आल्याने जे गुत्तेदार काम करणार नाहीत अशा गुत्तेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले व योजना राबवित असताना जर शासकीय अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावरही कारवाई करण्याच्या सूचना ना. बोर्डीकर यांनी दिल्या. यानंतर बैठकीत उपस्थित असलेल्या ग्रामीण भागातील काही महिलांनी गावामध्ये खुलेआम गुटखा विक्री, अवैध दारू विक्री, व अवैध धंदे जोमात सुरू असल्याची माहिती दिली यावर ना. बोर्डीकर यांनी पोलीस प्रशासनाला संबंधितावर तडीपार करण्याच्या सूचना देत कारवाई करण्याचे आदेश दिले.
यावेळी अनेक प्रश्नांची अधिकाऱ्यांना उत्तरे देखील देता न आल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच भांबेरी उडाल्याची पहावयास मिळाले. यानंतर ना.बोर्डीकर यांनी बैठकीत बोलताना सांगितले की,केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात व राज्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सुरू असून गतिमान सरकार व पारदर्शक सरकार या टॅगलाईनुसार जनतेची कामे झाली पाहिजे यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने विभाग प्रमुखांना सूचना देण्यात आल्याचे ना.बोर्डीकर यांनी सांगितले. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वडकुते,कळमनुरी तालुकाध्यक्ष ओंकार नावडे, विठ्ठल भोयर, महिला तालुकाध्यक्ष वर्षा खंदारे,अशोक संगेकर, उमेश सोमाणी,आमिष दरक, राहुल मेने,रमेश पाठक,योगेश संगेकर,अजय कदम, रुपेश कदम,रुखमाराव शिंदे, मसाराव करे, हनुमंत सुर्यवंशी, कैलास शिंदे,शंकरराव सुर्यवंशी, बाळु घुसे,अर्जुन बोरकर पारस मांडवगडे, नारायण डुरे,दत्ताआप्पा पचलिंगे,सोपान घुगे, अर्जुन बोरकर यांच्या सह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य मोजून मिळत नसल्याने गजाननराव घुगे आक्रमक
कळमनुरी तहसील कार्यालयातील धान्य गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य मोजून दिल्या जात नाही यापूर्वीही मी तक्रार केली होती परंतु पुरवठा विभागात तसाच अनागोंदी कारभार सुरू आहे या प्रश्नावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजाननराव घुगे आढावा बैठकीत चांगलेच आक्रमक झाले यापुढे स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य मोजून न दिल्यास ते वाहन भाजपाचे कार्यकर्ता पकडून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करतील यामुळे अधिकारी अडचणीत येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
आढावा बैठकीत अवैध वाळू व घरकुलाचा मुद्दा गाजला
कळमनुरी तालुक्यात अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ठराविक लोकांकडून कळमनुरी तालुक्यातील वाळू घाटातून बिनदिक्कतपणे अवैध वाळूची तस्करी सुरू आहे तसेच कळमनुरी पंचायत समितीकडून घरकुल मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप नागरिकांनी आढावा बैठकीत वारंवार केल्याने कळमनुरी तालुक्यात सुरू असलेले अवैध वाळूचा व घरकुलाचा मुद्दा चांगलाच गाजला.