आ. प्रज्ञा सातवांनी खोडून काढला प्रकाश थोरातांविरूद्ध झालेल्या तक्रारीचा मुद्दा
हिंगोली (Pragya Satav) : ‘जे-जे पक्षाचे कार्य करीत आहेत ते सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतात. प्रकाश थोरात यांच्या विरोधात जशी तक्रार झाली तशा तक्रारी होतच असतात, अशा तक्रारींची पक्षात कोणी दखल घेत नाही’ अशा शब्दांत तक्रारीचा मुद्दा (Pragya Satav) आ. प्रज्ञा सातवांनी खोडून काढला.
शुक्रवारी काँग्रेस पक्षा तर्फे हिंगोलीत तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपचे खासदार अनुराग ठाकुर यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत जातीवाचक बोलून अपमान केल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यां तर्फे अनुराग ठाकुर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पक्षा तर्फे हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी विधान परिषद सदस्या प्रज्ञा सातव यांना देण्यात आली आहे. कालच्या आंदोलनात त्या उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांनी हा विषय उपस्थित केला. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाच्या एका गटाच्या कार्यकर्त्याने प्रकाश थोरात यांच्या विरोधात पक्षाकडे तक्रार केली होती.
प्रकाश थोरात हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नसताना पक्षाचे नाव वापरीत असल्याबाबत ही तक्रार होती. काल काँग्रेस पक्षातर्फे झालेल्या आंदोलनात गोरेगावकर गटातील कार्यकर्ते गैरहजर होते. यावेळी पत्रकारांनी माजी तालुकाध्यक्ष प्रकाश थोरातांविरूद्ध झालेल्या तक्रारीचा विषय उपस्थित केला असता आ.सातव यांनी अशा तक्रारी होतच असतात, असे सांगून या तक्रारीचा मुद्दा खोडून टाकला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, गजानन देशमुख, प्रकाश थोरात आदींसहीत पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.