माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली!
नांदेड (Reading Inspiration Day) : भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि राम मनोहर लोहिया ग्रंथालय, नांदेड (Ram Manohar Lohia Library, Nanded) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन प्रेरणा दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.मिसाईल मॅन म्हणून जगविख्यात असलेल्या आणि भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदराने अभिवादन करण्यात आले.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर मनोगत!
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. देशभरातील तरुणाईला वाचनाची आवड लागावी या उद्देशाने हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने डॉ. कलाम यांच्या साहित्याचे एक विशेष ग्रंथ प्रदर्शनही भरवण्यात आले होते, जे उपस्थितांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले.
मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित राहून वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व वाढवले!
यावेळी नायब तहसीलदार मकरंद दिवाकर यांनी विद्यार्थ्यांना (Students) वाचनाचे महत्त्व आणि वाचनाची आवड निर्माण करण्याची आवश्यकता यावर आपले विचार मांडले. राम मनोहर लोहिया सार्वजनिक ग्रंथालयाचे ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रतिभा पापुलवार, अजय वट्टमवार, राजू पाटील, उत्तम घोरपडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित राहून वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व वाढवले.