१०४ महसूल मंडळात अतिवृष्टी तरी ना.राठोडांचा एकांगी कारभार
यवतमाळ (Yavatmal flood) : जिल्ह्यात जुलै,ऑगस्ट महिन्याच नव्हे तर सप्टेंबर महिन्यातही अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्तीचे तांडव सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये मागील तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्यांच्या हातातून होते नव्हते,ते पिक ही गेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आजच्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री ना.संजय राठोड यांनी जिल्ह्यातील पुरस्थितीची गंभीरता लक्षात घेवून त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे आवश्यक होते मात्र पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी एकट्याने प्रशासकीय अधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये पूरस्थितीचा आढावा घेवून सोपस्कार आटोपले असून आढावा बैठकीमध्ये औपचारिकते पलीकडे शेतकर्यांच्या दृष्टीने कुठल्याही महत्वपूर्ण निर्णय झाल्याचे दिसून आले नाही.
प्रकल्पातील जलविसर्गाने वाढली पूरची भिषणता
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीची अतिशय विदारक स्थिती झालेली आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानानंतर जे काही पिक शेतकर्यांच्या हाती येईल अशी अपेक्षा होती,ते पिकही आता हातचे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातील मागील तिन दिवसापासून मुसळधार पाऊस आहे,आणि पुढील दोन दिवसही पावसाचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.एकीकडे वरूण राजा अकांततांडव करीत आहे तर दुसरीकडे जल प्रकल्पातून गेट उघडून पाण्याचा विसर्ग केल्या जात असल्याने,दोन्ही स्वरूपाच्या संकटाला शेतकर्यांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यात पालकमंत्री ना.संजय राठोड यांना आपले मंत्रालय व आपल्या मतदार संघाच्या तीन तालुक्यांच्या पलीकडे लक्ष देण्यास वेळ नाही. अशा नैसर्गिक आपत्तीच्या स्थितीत आढावा बैठकीमध्ये जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलावून, त्यांच्या मतदार संघातील पूरस्थिती व त्यावर करायच्या उपाययोजनासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेसोबत चर्चा झाली असती.त्यासाठी आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री ना.संजय राठोड यांनी इतर लोकप्रतिनिधींना निमंत्रित करणे अत्यावश्यक होते.
किमान सत्ताधारी आमदारांना तरी आढावा बैठकीमध्ये बोलवायला हवे होते,मग काय निर्णय व्हायचा तो झाला असता. मात्र ‘हम करे सो कायदा’ या अविर्भावात पालकमंत्री साहेबांना इतर लोकप्रतिनिधींना सोबत घेण्याची आवश्यकता वाढली नसावी.त्यातही एकाही लोकप्रतिनिधीने आढावा बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी आपल्या ला का बोलविले नाही असा प्रश्नही उपस्थित केलेला नाही,किंवा जनतेचे हित लक्षात घेवून विना निमंत्रण कुठल्याही लोकप्रतिनिधीला आढावा बैठकीमध्ये जावून मतदार संघातील आपत्तीची भिषणता प्रशासनासमोर मांडून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी धडक भूमिका घ्यावीशी वाटली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांना परिस्थितीचे गांभीर्य नाही तर लोकप्रतिनिधींना जनतेशी घेणे देणे नसल्याने आढावा बैठकीच्या निमित्याने प्रतिबिंबीत होत आहे.
पालकमंत्र्यांना उद्ध्वस्त शेतशिवारांची पाहणी करावशी वाटत नाही का?
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने शेत पिक हातचे गेले आहे, अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. वाचलेल्या पिकांवर रोगराई आलेली आहे.त्यामुळे या सर्व नैसर्गिक आपत्तीचा फटका शेतकर्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. तेव्हा अशा संकटाच्या काळात शेतकर्यांच्या पाठीशी पालकमंत्र्यांनी उभे राहण्याचे आवश्यकता आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.संजय राठोड यांना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पुरस्थितीची पाहणी करण्याची आवश्यकता वाटत नाही का? असाही प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.
आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली
आज दैनिक देशोन्नतीने संपूर्ण जिल्ह्यावरच नैसर्गिक आपत्तीचा प्रकोप ; शेतकरी उद््ध्वस्त या शिर्षाखाली आढावा बैठकीत शेतकर्यांसाठी भरीव काही लागण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. जिल्हाधिकारी कार्याल्यातील महसूल भवन येथे आज पालकमंत्री ना.संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टी व पुरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी अतिवृष्टीने जिल्ह्यात शेती, घरे पिकांचे नुकसान झाले. एकही नुकसानग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे आदेश राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिले. या व्यतिरिक्त अतिवृष्टीने बाधित शेतकर्यांच्या हितासाठी कुठलाही ठोस निर्णय न घेवून पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीमध्ये शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.




