पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली प्रवक्तेपदी नियुक्ती!
बुलढाणा (Jayashree Shelke) : ज्यांचा आवाज मराठी सेवा संघात जिजाऊ ब्रिगेडच्या चळवळीचा केंद्रबिंदू बनला होता, ज्यांचा आवाज परिवर्तनवादी चळवळीत घुमत होता, ज्यांचा आवाज शिवसेनेच्या विधानसभेच्या विदर्भातील पहिल्याच प्रचार सभेत उद्धव ठाकरेंना भारून गेला होता.. अन् नुकताच ज्यांचा आवाज “ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी..” या गाण्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर तुफान व्हायरल झाला.. तोच आवाज आता “शिवसेनेचा एकच आवाज” बनला आहे. उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्याच्या जयश्रीताई शेळके (Jayashree Shelke) यांना महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या बनविले आहे !
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते “सामना” या मुखपत्रातून जाहीर केले, त्यात खा. संजय राऊत व खा. अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी तर आ. अनिल परब, खा. प्रियंका चतुर्वेदी, आनंद दुबे, सुषमा अंधारे, हर्षल प्रधान यांच्यासमवेत जयश्रीताई शेळके (Jayashree Shelke) यांनाही प्रवक्ते बनविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे “सामना”ला हे वृत्त प्रकाशित करताना, जयश्रीताई शेळके यांच्या फोटोसह त्यांच्या कार्याचा बॉक्स देण्यात आला आहे. त्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जयश्री शेळके (Jayashree Shelke) यांच्यावरही शिवसेना प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेळके यांनी बचत गट चळवळीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये असंख्य महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
उत्कृष्ट वक्ता म्हणून त्या परिचित असून सामाजिक विषयांवर त्यांची महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली या राज्यांमध्ये जवळपास दोन हजारांहून अधिक व्याख्याने झालेली आहेत. २०२४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारही होत्या. अवघ्या ८४१ मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. त्या कायद्याच्या पदवीधर असून समाजकारण, राजकारण, कृषी, उद्योग, विधी, बचत गट, महिला, सक्षमीकरण या सर्वच क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, अशी माहितीही पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.