उपांत्य फेरीतील पराभवानंतर भावूक झाली सुचिका; मंगोलियन खेळाडूवर विजय मिळवत आधीच पदक केले होते निश्चित
2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सुचिका तरियालने मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. महिलांच्या 60 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावत सुचिकाने भारताला या क्रीडा प्रकारातील पहिलेवहिले आशियाई क्रीडा पदक मिळवून दिले. मात्र, अंतिम फेरी गाठता न आल्याची खंत तिच्या भावूक प्रतिक्रियेतून स्पष्ट झाली.
सोमवारी उपांत्य फेरीत सुचिकासमोर सिंगापूरची तेओ हुई हून हिचे आव्हान होते. दोघींमध्ये अत्यंत चुरशीचा सामना झाला. सुचिकाने शेवटपर्यंत झुंज देत लढत ओव्हरटाइमपर्यंत नेली. मात्र, अंतिम निकाल सिंगापूरच्या खेळाडूच्या बाजूने लागल्यानंतर सुचिका भावूक झाली आणि तिच्या डोळ्यांत अश्रू आले.
VIDEO | Nagoya, Japan: Suchika Tariyal was left heartbroken after a closely fought bout ended in a controversial weight-based ruling, but the Indian fighter still created history by winning the country’s maiden Asian Games medal in mixed martial arts at the 20th edition of the… pic.twitter.com/J7mZgRncAC
— Press Trust of India (@PTI_News) September 21, 2026
उपांत्य फेरीचा निकाल जाहीर करण्यासाठी दोन्ही खेळाडूंना पोडियमवर बोलावण्यात आले होते. मात्र, निराश झालेल्या सुचिकाने सुरुवातीला पोडियमवर जाण्यास नकार दिला. भारतीय प्रशिक्षकांनी तिची समजूत काढल्यानंतर ती पोडियमवर पोहोचली. त्यावेळी तिच्या डोळ्यांत अश्रू होते. पदक मिळाल्याचा आनंद आणि अंतिम फेरीत स्थान मिळवता न आल्याची निराशा, अशा दोन्ही भावना तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होत्या.
मंगोलियन खेळाडूवर विजय; पदक निश्चित
सुचिकाने रविवारी उपांत्यपूर्व फेरीत मंगोलियाच्या अल्तांचिमेग बायगलमा हिचा 2-0 असा पराभव केला. या विजयामुळेच तिचे भारतासाठी MMAमधील पदक निश्चित झाले होते. 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच मिक्स्ड मार्शल आर्ट्सचा समावेश करण्यात आला आहे.
यंदाच्या स्पर्धेत MMAसोबत BMX, टेकबॉल, पॅडेल, सर्फिंग आणि व्हर्च्युअल तायक्वांदो या क्रीडा प्रकारांचाही प्रथमच समावेश करण्यात आला आहे.
🇮🇳🔥 HISTORY MADE! 🔥🇮🇳
— Bharat | Tech • Finance • Knowledge (@saggi4987) September 21, 2026
Suchika Tariyal has scripted history by winning India’s FIRST-EVER MMA MEDAL at the Asian Games! 🥉
Congratulations,Suchika! 🇮🇳👏#SuchikaTariyal #MMA #AsianGames2026 #India #TeamIndia #Historic #BronzeMedal #IndianSports pic.twitter.com/PwDfvYacru
सात वर्षांच्या विश्रांतीनंतर MMAमध्ये पुनरागमन
सुचिका तरियालने 2017मध्ये MMAमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर जवळपास सात वर्षे ती या क्रीडा प्रकारापासून दूर राहिली. या काळात तिने ज्युडो आणि जिऊ-जित्सूमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
2024मध्ये सुचिकाने ब्रेव्ह कॉम्बॅट फेडरेशनसोबत करार केला. त्यानंतर डिसेंबर 2024मध्ये बहरीन येथे झालेल्या ब्रेव्ह CF 92 स्पर्धेतून तिने व्यावसायिक MMAमध्ये पुन्हा प्रवेश केला.
वयाच्या 12व्या वर्षी आलेल्या अनुभवातून स्वसंरक्षणाचा प्रवास
हरियाणातील रोहतक येथील सुचिकाची क्रीडा कारकीर्द संघर्षांनी भरलेली आहे. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी विनयभंगाच्या घटनेला सामोरे गेल्यानंतर तिने स्वसंरक्षणासाठी ज्युडो शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिने क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती केली.
सुचिकाने 20हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून ती आठ वेळा राष्ट्रीय ज्युडो चॅम्पियन ठरली आहे. 2019च्या कॉमनवेल्थ ज्युडो चॅम्पियनशिप तसेच दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवले. 2022च्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये 57 किलो वजनी गटातही तिने प्रभावी कामगिरी केली; मात्र, त्यावेळी तिला पदकापासून थोडक्यात दूर राहावे लागले.
2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मात्र सुचिकाने MMAमध्ये कांस्यपदक पटकावत भारताच्या नावावर ऐतिहासिक नोंद केली आहे.