Yawatmal :- यवतमाळ नवीन शैक्षणिक सत्राला विदर्भात आजपासून सुरुवात झाली असून आज शाळेची पहिली घंटा वाजताच उन्हाळातील सुट्टयांच्या दिर्घ विश्रांतीनंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट अनुभवास आला. जिल्हा परिषद(Zilla Parishad), नगरपरिषद प्रशासन तसेच खासगी संस्थांकडून विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन, वाजतगाजत प्रभात फेरी काढून थाटात स्वागत करण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासनातील प्रमुख अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. यवतमाळ शहरातील गोदणी रोड वरील जि.प. माध्य.शाळेमध्ये जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देवून त्यांचे स्वागत केले. तर बाभुळगाव तालुक्यातील जि.प.शाळा आसेगाव देवी येथील विद्यार्थ्यांचे स्वागत चारचाकी वाहनातून प्रभातफेरी काढून करण्यात आली.
खासगी अनुदानात शाळा बंद होत्या, त्यामुळे या शाळांमध्ये शुकशुकाट
दुसरीकडे जिल्ह्यात खासगी संस्था संचालक मंडळाच्या वतीने विद्यार्थी हितांच्या मागण्यांची दखल शासनाने घ्यावी याकरीता आज शाळेच्या पहिल्या दिवशी‘शाळा बंद’आंदोलन पुकारले. त्यामुळे खासगी अनुदानात शाळा बंद होत्या, त्यामुळे या शाळांमध्ये शुकशुकाट पहायला मिळाला. सदर शाळा बंद आंदोलनास १०० टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला असून उद्या २४ जून रोजी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नववर्ष स्वागत सोहळा शाळांमध्ये घेण्यात येणार असल्याचेही संघटनेच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.