गडचिरोली (Gadchiroli) :- नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणारा परीपोषण अनुदान तसेच अन्य सुविधांच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या अधिनिस्त असलेल्या अनुदानित संस्थांच्या वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्याचे परीपोषण अनुदान व अन्य सुविधा पुरविण्यासाठी लागणार्या निधीत हात आखडता घेतला असल्याने ‘आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी तुपाशी तर सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील (Hostel) विद्यार्थी उपाशी’ अशी स्थिती दिसुन येत आहे.
परीपोषण अनुदान व अन्य सुविधा उपलब्ध करतांना शासनाचा दुजाभाव
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी राज्यभरात विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसतीगृहे कार्यरत आहेत.या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आता सुधारित दरानुसार अधिक आर्थिक सहाय्य मिळणार आहे. यामध्ये दरमहा निर्वाह भत्ता (कंसात जुना दर) : विभागीय स्तरासाठी १४०० रूपये (८००), जिल्हा स्तरासाठी १३०० रूपये (६००) आणि ग्रामीण/तालुका स्तरासाठी १००० रूपये (५००) इतका भत्ता देण्यात येणार आहे. मुलींना मिळणारा अतिरिक्त निर्वाह भत्ताही १०० वरून १५० रूपये इतका वाढविण्यात आला आहे.
वसतिगृहातील कर्मचार्यांनाही शासन नियमाप्रमाणे वेतन दिले जात असते
शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी वार्षिक भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये इयत्ता ८ वी ते १० वीसाठी ४५०० रूपये (कंसात जुना दर) (३२००), ११ वी, १२ वी व पदविका अभ्यासक्रमासाठी ५००० रूपये (४०००), पदवी अभ्यासक्रमासाठी ५७०० रूपये (४५००) तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ८००० रूपये (६०००) एवढा भत्ता मंजूर झाला आहे.आहार भत्ता (दर महिना) महानगरपालिका व विभागीय शहरांतील वसतिगृहासाठी ५००० रूपये (३५००) आणि जिल्हा स्तरावरील वसतिगृहांसाठी ४५०० रूपये (३०००) इतका भत्ता निश्चित करण्यात आला आहे. या वसतिगृहातील कर्मचार्यांनाही शासन नियमाप्रमाणे वेतन दिले जात असते. मात्र समाजकल्याण विभागाच्या अधिनिस्त असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या वसतिगृहात राहणार्या कर्मचार्यांना पुरेसे मानधन दिले जात नाही. अनुदानित संस्थांच्या वसतिगृहातील अधीक्षकांना सद्यास्थितीत दरमहा १०००० रूपये मानधन दिले जाते. अनुदानित वसतिगृहात राहुन शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना अत्यल्प परीपोषण अनुदान दिले जात असते. वसतिगृहात मानधनावर कार्य करणारे वसतिगृह अधीक्षक, चौकीदार, स्वयंपाकी यांना अत्यल्प मानधन दिले जाते. मात्र हे मानधन कधीच दरमहा तसेच वेळेवर मिळत नाही.