Yawatmal :- ४ वर्षाच्या दीर्घ काळानंतर नगरपरिषदांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यात सोमवारी मुंबई येथे नगराध्यक्षाची आरक्षण सोडत झाली या आरक्षण सोडतीत आधी बांधलेले अंदाज आणि प्रत्यक्ष निघालेल्या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांना धक्का बसला आहे. यवतमाळ, दिग्रस व वणी या नगर परिषदेच्या (City Council) नगराध्यक्षांच्या निघालेल्या आरक्षणामुळे अनेकांना चकीत केले आहे. त्यामुळे कुणाला आनंदाचा, कुणाला आश्चर्याचा तर कुणाला अपेक्षाभंगाचा धक्का बसला आहे. प्रत्यक्षात सोमवारी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे नगराध्यक्षपद आता महिलांकडे येणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात (Politics) महिलाराज राज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरक्षण सोडतीने कुठे खुशी तर कुठे दु:ख
जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणुका जवळपास ४ वर्षांपासून खोळंबल्या होत्या. त्यामुळे माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष यांच्यात एक प्रकारची अस्वस्थता होती. तर सामान्य नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणारी लोकप्रतिनिधीच नसल्याने नागरिकही त्रस्त झाले होते. प्रशासक म्हणून मुख्याधिकारी जबाबदारी पाहात असले तरी अनेक नगरपरिषदांमध्ये नागरिक आणि प्रशासक यांच्यात वाद होत होते. त्यामुळे सर्व जण निवडणुकांची वाट पाहात होते. अखेर आता निवडणूक आयोगाने नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, सोमवारी मुंबईत (Mumbai)नगरविकास विभागाने राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर केले.
त्यात यवतमाळ जिल्ह्यातील नगराध्यक्षांची पदे कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा लागलेल्या होत्या. यवतमाळ, दिग्रस, वणी अशा ठिकाणी निघालेल्या आरक्षणाने अनेक इच्छूकांच्या दांड्या उडविल्या आहेत. तर बर्याच ठिकाणी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याने तेथे इच्छूकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे