बाभूळगाव (Yawatmal) :- भाड्याने दिलेला ट्रॅक्टर परत का नेला, या कारणावरून शहरातील शिवछत्रपती चौकातील एजाज अली यांचे घरासमोर १८ जून रोजी धारदार चाकूच्या जोरावर दोन गावगुंडांनी धुमाकुळ घातला होता. तसेच चारचाकी वाहनाच्या व घराच्या खिडकीच्या काचाची तोडफोड करून नुकसान करून पसार झाले होते. या घटनेतील दोन्ही आरोपींच्या बाभूळगाव पोलिसांनी अवघ्या ४८ तासात मुसक्या आवळल्या. आरोपींना अटक करून जेरबंद केले.
चारचाकी वाहनाच्या व घराच्या खिडकीच्या काचाची तोडफोड करून नुकसान करून आरोपी पसार
वैभव उर्फ जहरीला अंबादास जांभुळकर आणि विशाल ऊर्फ पच्चीस अरुण रायबल दोघेही राहणार बाभुळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी वैभव जांभुळकर आणि विशाल रायबल यांना एजाज अली यांनी स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्टर भाड्याने दिला होता. मात्र, त्याचे भाडे सुरळीत मिळत नसल्याने दोन दिवसांपूर्वीच एजाजने तो ट्रॅक्टर (Tractor) परत नेला. त्यामुळे संतप्त झालेल्या त्या दोघांनी १८ जून रोजी सकाळी एजाजच्या घरी जावून त्यांना शिवीगाळ केली. धारदार शस्त्राचा धाक दाखवत त्याच्या कारची तोडफोड केली. शिवाय घराच्या खिडकीच्या काचाही फोडल्या. सुमारे तीस मिनिटांपर्यंत हा थरार सुरू होता. दरम्यान संबंधित दोन्ही आरोपींनी एजाजवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रसंगावधान राखून त्याच्या पत्नीने त्याला घरात घेऊन दार बंद केल्याने त्याचा जीव बचावला.
घटनास्थळी पोलिस येईपर्यंत आरोपी तेथून पसार झाले होते. या घटनेनंतर एजाज आणि त्याच्या पत्नीने स्थानिक पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी त्या दोघांचा शोध घेत २० जून रोजी जहरीला व पच्चीसला त्यांच्या घरून अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक लहुजी तावरे यांचे मार्गदर्शनात जमादार गणेश शिंदे, विजय लोखंडे, निलेश भुसे, दिनेश अहिरे यांनी केली.