परभणी (Parbhani) :- जालन्याला जातो म्हणून सोन्ना येथील घरुन निघालेल्या जावयाने याच परिसरातील एका शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या (Suicide) केली. ही घटना बुधवार २८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ. सतीश मोरे करत आहेत.
राहूल भानुदास कुमकर वय ३८ वर्ष असे मृतकाचे नाव आहे. सदर व्यक्ती हा परभणीतील सोन्ना येथे सासरवाडीत आला होता. २८ ऑगस्ट रोजी सकाळी तो जालन्याला जातो म्हणून सासरवाडीतून घराबाहेर पडला. सोन्ना शिवारातील एका विहिरीत उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सदर युवक हा २६ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जालना येथून सोन्ना येथे सासरवाडीत आला होता. या प्रकरणी येणुबाई कुमकर यांच्या खबरीवरुन दैठणा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला.