आदिवासी विभागाच्या न्युक्लीयस बजेट योजने अंतर्गत महिलांना सक्षम, आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा मुख्य हेतू!
कळमनुरी (Tribal Women Empowerment) : विरांगणा राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेचा जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आला. आदिवासी विभागाच्या न्युक्लीयस बजेट योजने अंतर्गत महिलांना सक्षम, आत्मनिर्भर (Independent) बनविणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे होते तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी रमेश भडके, उमाकांत कोटूरवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रम राज्यभरात एकाचवेळी पार पाडण्यात आला.
राणी दुर्गावती यांच्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे प्रोत्साहन महिलांना दिले!
हिंगोली येथे प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे यांच्या नेतृत्वाखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. यावेळी आदिवासी महिला बचत गटांना पत्रावळी व द्रोण बनविण्याचे मशीन घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे, शेळी गट वाटप, वनहक्क पटटेधारकांना शेती औजारे घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे अशा विविध योजनांचा लाभ देण्यात आला. डॉ. सुनिल बारसे यांनी कार्यक्रमामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करतांना राणी दुर्गावती यांचा जीवनपरिचय मांडला व महिलांनी राणी दुर्गावती (Queen Durgavati) यांच्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे प्रोत्साहन महिलांना दिले. सदर कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांनी व वनहक्क पटटेधारकांनी आपले मनोगत मांडताना समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.