शिक्षकविना शिक्षणाची भीती
तुमसर (School Closed) : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केलेल्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या सुधारित संचमान्यतेच्या निकषांमुळे भंडारा जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल ३९ शाळा बंद (School Closed) होण्याच्या मार्गावर असून ६६ शाळांना शिक्षकच मिळणार नाहीत, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
सुधारित संचमान्यतेनुसारदि.१५ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या दि.३० सप्टेंबर २०२४ रोजीच्या आधारावर वैध पटसंख्येनुसार शिक्षक पदे मंजूर केली जाणार आहेत. या निकषांमुळे अनेक शाळांना शिक्षक पदेच मिळणार नसल्याने गरीब, शेतकरी, कामगार, आदिवासी व झोपडपट्टीत राहणार्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. विशेषतः सहावी ते आठवी या वर्गांसाठी वीस पटसंख्येवर दोन शिक्षक आणि त्यापेक्षा जास्त असल्यास तीन शिक्षक मंजूर करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील संघटनांनी केली आहे. मात्र शासनाने हे निकष स्वीकारले नसल्यामुळे अनेक शाळांची (School Closed) शिक्षक भरती शून्यावर आली आहे.
नववी-दहावीच्या वर्गांत ‘शून्य पदे’, शिक्षक ठरणार ‘अतिरिक्त’
सर्वात गंभीर बाब म्हणजे नववी व दहावीपैकी एका वर्गात पटसंख्या २०च्या खाली असल्यास त्या वर्गांसाठी शून्य शिक्षक पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे संबंधित (School Closed) शाळांचे शिक्षक ‘अतिरिक्त’ ठरतील आणि त्यांचे वर्ग चालवणेच अशक्य होईल.
राजकीय पुढार्यांच्या दुहेरी भूमिकेवर टीका
दरम्यान काही राजकीय नेते एका खासगी सीबीएसई (School Closed) शाळेत विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी जीव ओतून प्रयत्न करतांना दिसत आहेत. मात्र जिल्ह्यातील या ३९ संकटग्रस्त शाळांसाठी त्यांनी अद्यापही कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देत, ‘गरिबांच्या मुलांच्या शाळा वाचविण्यासाठीही लढा उभारावा, अशी मागणी पुढे केली आहे.
ही संचमान्यता केवळ आकड्यांवर आधारित असून शैक्षणिक वास्तवाचा विचार न करता घेतलेला निर्णय असल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी केला आहे. दुर्गम व आदिवासी भागातील मुलांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित ठेवणारा हा निर्णय तात्काळ मागे घेऊन २०२४-२५ संचमान्यता सुधारित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.