House of Lords

हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा सन्मान; मराठीतून मांडली महाराष्ट्राची विकासगाथा

हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा सन्मान झाला. ‘लाडकी बहीण’, ‘शासन आपल्या दारी’, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि भारत-ब्रिटन संबंधांवर त्यांनी भाष्य केले.

हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये एकनाथ शिंदेंचा सन्मान; मराठीतून मांडली महाराष्ट्राची विकासगाथा

House of Lords

‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ने सन्मान; मराठीतून ‘नमस्कार, जय महाराष्ट्र’ म्हणत मातृभाषेचा अभिमान व्यक्त

लंडन : ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासनासाठी त्यांना ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरविण्यात आले. या सोहळ्यात महाराष्ट्राच्या विकासाची दिशा, विविध लोककल्याणकारी योजना आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीची माहिती त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.

आपल्या भाषणाची सुरुवात एकनाथ शिंदे यांनी ‘नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशा मराठी शब्दांनी केली. त्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी सभागृह दुमदुमले. ब्रिटनच्या संसदेत बोलण्याची संधी मिळणे हा आपल्यासाठी मोठा बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र-ब्रिटन सहकार्याला मोठी संधी

मुंबई आणि लंडन ही दोन्ही जागतिक पातळीवरील महत्त्वाची वित्तीय केंद्रे असल्याचे नमूद करत एकनाथ शिंदे यांनी दोन्ही प्रदेशांमधील सहकार्याच्या नव्या संधींकडे लक्ष वेधले. फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास या क्षेत्रांत महाराष्ट्र आणि ब्रिटन एकत्रितपणे मोठे काम करू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. ब्रिटिश उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टांचा गौरव

हाऊस ऑफ लॉर्ड्समधील सन्मान हा केवळ वैयक्तिक गौरव नसून महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या कष्टांचा, आकांक्षांचा आणि राज्याच्या विकासाच्या वाटचालीचा सन्मान असल्याचे शिंदे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा विचार आणि सामान्य नागरिकाला केंद्रस्थानी ठेवणारे प्रशासन या त्रिसूत्रीच्या आधारावर महाराष्ट्राची विकासयात्रा पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठी भाषेतून महाराष्ट्राची ओळख

एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात कवी सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी… जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी…’ या ओळींचा उल्लेख केला. ब्रिटनच्या संसदेत मराठी भाषेतून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख मांडत त्यांनी मातृभाषेबद्दलचा अभिमान व्यक्त केला.

आई आणि पत्नीच्या कष्टांचा उल्लेख

आपल्या जीवनप्रवासाचा संदर्भ देताना शिंदे यांनी आपण मोठ्या सुखवस्तू कुटुंबातून आलो नसल्याचे सांगितले. आई आणि पत्नी यांनी आयुष्यभर केलेले कष्ट जवळून पाहिल्यामुळे सामान्य माणसाच्या अडचणी आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू समजून घेण्याची दृष्टी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

याच अनुभवातून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची विचारसरणी तयार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि सरकारी सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणारा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

‘लाडकी बहीण’ ही केवळ मदत योजना नाही

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही केवळ आर्थिक मदत किंवा चॅरिटी नसून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या योजनेचा महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाबरोबरच कुटुंबातील आरोग्य, पोषण आणि मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘माझी एक बहीण आहे, मात्र लाडकी बहीण योजनेमुळे मला करोडो बहिणी मिळाल्या आहेत,’ असे सांगताना शिंदे यांना सभागृहातून टाळ्यांची दाद मिळाली. जागतिक स्तरावरील संस्थांनीही या योजनेची दखल घेतल्याचे त्यांनी सांगितले.

‘शासन आपल्या दारी’चा लाभ

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील गावागावांत सरकारी सेवा पोहोचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पाच कोटींहून अधिक नागरिकांना विविध कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

याशिवाय दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग, ट्रान्सजेंडर धोरण, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकारी मदत आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना दिली जाणारी मदत यांचाही त्यांनी आढावा घेतला.

विकासाचा अर्थ केवळ पायाभूत सुविधा नव्हे

विकासाची व्याख्या केवळ रस्ते, पूल, मेट्रो किंवा उंच इमारतींपुरती मर्यादित नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संधी पोहोचणे आणि नागरिकांना सन्मानाने जगता येणे हे विकासाचे खरे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याच भूमिकेतून लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मदत, दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग, ट्रान्सजेंडर धोरण आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता यांसारखे उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. ‘इट इज अ पिपल सेंट्रीक अप्रोच ऑफ टू द पब्लिक सर्व्हीस’ असे म्हणत त्यांनी नागरिक-केंद्री प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार

महाराष्ट्राला भारताचे औद्योगिक आणि आर्थिक पॉवरहाऊस संबोधताना शिंदे यांनी राज्याचा भारताच्या जीडीपीमध्ये सुमारे १४ टक्के वाटा असल्याचे सांगितले. देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग, अटल कोस्टल ब्रिज आणि मुंबई कोस्टल रोड यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा उल्लेख करत महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. २०३० पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारत-ब्रिटन संबंधांवर भर

भारत आणि ब्रिटनचे संबंध नव्या सुवर्णयुगात प्रवेश करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारधारेचा उल्लेख करत त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होत असल्याचे नमूद केले.

ब्रिटनमध्ये राहणारे ७० हजारांहून अधिक महाराष्ट्रीय नागरिक हे भारत-ब्रिटन संबंधांमधील महत्त्वाचा मानवी दुवा असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक

महाराष्ट्राच्या विकासाची माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. नरेंद्र मोदी हे भारताचे ‘व्हिजनरी आणि डायनॅमिक लीडर’ असल्याचे त्यांनी म्हटले. मोदी यांना जगातील ३६ हून अधिक देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने पुढे जात असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

ब्रिटनमध्ये पार पडला सन्मान सोहळा

यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर ऑनरेबल बॅरोनेस आर्लेन फॉस्टर, यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांच्यासह संसदेच्या सभागृहांचे सदस्य, ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि सध्या उपमुख्यमंत्री म्हणून राबविलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीसाठी एकनाथ शिंदे यांना हा सन्मान देण्यात आला. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठीची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि नागरिकांना सरकारी सेवा त्यांच्या दारापर्यंत उपलब्ध करून देणारा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम यांचा मानपत्रात विशेष उल्लेख करण्यात आला.

सामान्य माणसासाठी काम करण्याची बांधिलकी

‘मी मुख्यमंत्री नाही, मी एक सामान्य माणूस आहे,’ हा मुख्यमंत्रीपदाच्या काळातील दृष्टिकोन आजही कायम असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची आपली बांधिलकी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या विकासाची गती कायम ठेवत नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणे हेच प्रशासनाचे केंद्र असले पाहिजे, असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.

संबंधित सामग्री

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाकडून गौरव; ‘राष्ट्र प्रथम’च्या भूमिकेचा ठरावात उल्लेख

पंतप्रधान मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा केंद्रीय मंत्रिमंडळाने गौरव केला. विकास, कल्याण, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि जागतिक भूमिकेचा ठरावात उल्लेख.

Oct 07, 2026
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा जगतापांना गंभीर सवाल; ‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?'

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा. २१ जागांसाठी ११ ऑक्टोबरला मतदान; तीन पॅनेलमध्ये तिरंगी लढत.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
“कमाल कर दिया पायलट जी!” फ्लायदुबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे सलमान खानकडून कौतुक

“कमाल कर दिया पायलट जी!” फ्लायदुबईच्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे सलमान खानकडून कौतुक

फ्लायदुबई FZ1073 संकटातील कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे सलमान खानने कौतुक केले. मोदींसोबतच्या संवादात मच्छार यांनी थरारक अनुभव सांगितला.

Oct 03, 2026