स्टॉकहोम मतदारसंघातून विजय; ग्रीन पार्टीच्या नेत्या म्हणून संसदेत मुलांचे कल्याण आणि पर्यावरण संरक्षणावर भर
महाराष्ट्राच्या राजकारणासह सहकार क्षेत्रात दीर्घकाळ प्रभाव असलेल्या विखे पाटील कुटुंबाच्या कार्याचा विस्तार आता स्वीडनच्या राजकीय पटलावर झाला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे. स्टॉकहोम शहर मतदारसंघातून त्यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली.
ग्रीन पार्टीच्या नेत्या असलेल्या नीला विखे पाटील यांनी यापूर्वी स्वीडनमध्ये राजकीय सल्लागार आणि नगरसेविका म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. संसदेत प्रवेश केल्यानंतर मुलांचे कल्याण आणि पर्यावरण रक्षणाच्या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सहकाराचा वारसा स्वीडनपर्यंत
नीला विखे पाटील यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास त्यांच्या कुटुंबाच्या वारशाशी जोडलेला आहे. आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या त्या पणती आहेत. तसेच माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत.
स्वीडनच्या ३४९ सदस्यांच्या संसदेत निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या प्रमुख नेत्यांमध्ये नीला विखे पाटील यांचा समावेश झाला आहे.
अहिल्यानगरशी असलेले नाते
नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला, तरी त्यांच्या बालपणाचा आणि सुरुवातीच्या शिक्षणाचा काळ अहिल्यानगरमध्ये गेला. पुढील शिक्षणातही त्यांनी उच्च शैक्षणिक पात्रता मिळवली. गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून त्यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली असून, त्यासोबत एमबीएचे शिक्षणही पूर्ण केले आहे.
माजी पंतप्रधानांच्या कार्यालयात राजकीय सल्लागार
ग्रीन पार्टीमध्ये सक्रिय भूमिका बजावणाऱ्या नीला विखे पाटील यांनी खासदार होण्यापूर्वी स्वीडनचे माजी पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात विशेष राजकीय सल्लागार म्हणून काम केले. वित्त, करप्रणाली आणि गृहनिर्माण या महत्त्वाच्या विषयांशी संबंधित जबाबदाऱ्या त्यांनी या काळात सांभाळल्या.
याशिवाय स्टॉकहोम महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
१५व्या वर्षी आजोबांकडून अर्थसंकल्पाचा अभ्यास
स्वीडनच्या संसदेत निवड झाल्यानंतर नीला विखे पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा प्रसंग सांगितला. देश आणि स्टॉकहोम शहराचे संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.
आपले आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांना अभिमान वाटेल, अशा पद्धतीने काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आपण १५ वर्षांचे असताना आजोबांनी राज्याचा अर्थसंकल्प वाचायला लावला होता. त्याच अनुभवातून आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात झाल्याचे नीला यांनी सांगितले.