तुषार संच व ठिबकचे अनुदान मिळाले नाही
मानोरा(Washim) :- कृषि विभागाच्या (Department of Agriculture) वतीने शेतकऱ्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेसाठी महाडीबीटीवर ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सोडत होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना तुषार संच व ठिबक खरेदी करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.
महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांचे अनेक अर्ज
सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठीच तुषार संच व ठिबकची शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यकता आहे. अश्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर (Maha DBT Portal)ऑनलाईन अर्ज सादर केले आहे. मात्र या योजनेची कृषी विभागामार्फत सोडत होत नसल्यामुळे अनेक शेतकरी खरेदी पासून वंचित राहत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या साहित्याचे अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. यात काही शेतकऱ्यांना दहा महिन्यापासून खरेदी केलेल्या तुषार संच व ठिबकचे अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहे.