नाईक ऑडिटोरियमला अजून किती वर्ष लागणार!
मानोरा (Water Conservation Day) : जलसंधारणाचे जनक, माजी राज्यपाल तथा माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणाच्या प्रेरणादायी कार्याच्या गौरवार्थ तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी 10 मे सुधाकरराव नाईक यांचा स्मृती दिवस “जलसंधारण दिन” म्हणून साजरा करण्याबाबत निर्णय घेतला होता. तसेच त्यांच्या नंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 10 मे जलसंधारण दिनानिमित्त अकोला येथे भव्य स्वरूपात साजरा करून जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करीत एक प्रेरणादायी संदेश महाराष्ट्रात दिला होता. परंतु, त्यानंतरच्या काळात ‘जलसंधारण दिवस’ (Water Conservation Day) शासकीय स्तरावर साजरा होत नसल्याने तसेच मागील काही वर्षांपासून हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या कार्याचा अनादर होत असल्याने समाजात नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभागाचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड तसेच या विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची आमदार राजेश राठोड (MLA Rajesh Rathod), माजी खासदार हरीभाऊ राठोड, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते एकनाथ पवार, राजेश चव्हाण जालनेकर, विकास चव्हाण आदिनी भेट घेतली. ‘जलसंधारण दिवस’ शासकीय स्तरावर साजरा करण्याची त्यांनी मागणी केली. “पाणी अडवा पाणी जिरवा” हा प्रेरणादायी मुलमंत्र देत जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनी आपले संपूर्ण आयुष्य जल संधारणासाठी व्यतीत करून जलसंधारणाची चळवळ उभी केली होती. तसेच क्रांतिकारी योजनेसह स्वतंत्र जलसंधारण विभागाची देखील त्यांनी पहिल्यांदा निर्मिती केली होती.
गेल्या अनेक वर्षांपासून वसंतराव नाईक ऑडिटोरियम थंडबस्त्यात!
हरितक्रांतीचे जनक महानायक वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नागपूर येथे अत्याधुनिक ऑडिटोरियम उभारण्याचा शासनाने सन 2012 मध्ये निर्णय घेतला होता. गेल्या अनेक वर्षांपासून वसंतराव नाईक ऑडिटोरियम थंडबस्त्यात आहे. नाईक ऑडिटोरियमला अजून किती वर्ष लावणार? असा सवाल आ.राठोड यांनी केला. या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी वसंतराव नाईक जन्मशताब्दी समितीचे सदस्य, माजी खासदार हरीभाऊ राठोड, आमदार राजेश राठोड आणि या ऑडिटोरियमचे सातत्याने 15 वर्षांपासून पाठपुरावा करणारे एकनाथ पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे मागणी केली. ऑडिटोरियमसाठी निधीच्या तरतूदीबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी सकारात्मकता दर्शवली. तसेच वसंतराव नाईक ऑडिटोरियमसाठी लक्ष घालणार असून ते लवकरच मार्गी लावणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, आदीवासी, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विश्वास दर्शविला.