मोबाईलवर स्टेटस ठेऊन युवक झाला होता बेपत्ता!
परभणी (Youth Missing) : परभणीच्या सोनपेठ शहरात मी तुम्हाला कायमचा सोडून जात आहे, मला माफ करा असे मोबाईलवर स्टेटस ठेऊन घरातुन निघुन गेलेल्या, युवकाचा तांत्रिक दृष्टीने तपास करत पोलिसांनी शोध लावला. त्यानंतर युवकाचे समुपदेशन करत त्याचे मन परिवर्तन केले. ही घटना सोनपेठ शहरात उघडकीस आली. पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका युवकाचा जीव वाचला आहे.
परभणीतील सोनपेठ शहरातील प्रकार!
सोनपेठ शहरातील गणेश बाळासाहेब कराळे (वय 26 वर्ष) हा तरुण त्याच्या खाजगी कारणामुळे मी तुम्हाला कायमचा सोडून जात आहे, मला माफ करा असे मोबाईलवर स्टेटस ठेऊन घरातुन निघुन गेला. मुलाचे नातेवाईक, मित्रमंडळी यांनी सदर स्टेटस पाहिल्यानंतर, सोनपेठ पोलिस स्टेशन (Sonpeth Police Station) गाठले. पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखत सोनपेठ पोलिसांनी तात्काळ तरुणाचा मोबाईल क्रमांक सायबर सेलला (Cyber Cell) पाठविला. तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) करत तरुणाच्या मोबाईलचे लोकेशन काढण्यात आले. त्यानंतर पोउपनि. अजय किरकन यांनी घटनास्थळी जात युवकाला ताब्यात घेतले. पोलिस स्टेशन मध्ये आणुन त्याचे समुपदेशन करत तरुणाचे मन परिवर्तन करण्यात आले. तरुणाला सुखरुप पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई (Action) सपोनि. विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. अजय किरकन यांनी केली.