परभणीतील वालूर येथील घटना, पोलीसांना उलगडेना कोडे!
परभणी (Youth Murder) : परभणीच्या सेलू तालूक्यातील वालूर येथील शेत आखाड्यावर चोरट्यांनी हैदोस माजवून एका यूवकाचा खून करून इतर दोन जणांना जखमी करून चोरी केल्याची घटना घडली आहे.बूधवार मध्यरात्री २२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ ते १ दरम्यान वालूर शिवारातील बोरी रस्त्यावर असलेल्या सोनवणे यांच्या आखाड्यावर झोपेत असलेल्या संतोष आसाराम सोनवणे (वय २२) आणि त्यांची आजी यांच्यावर अज्ञात चोरट्यांनी (Thief) लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात संतोष सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला, तर आजी गंभीर जखमी झाली आहे. चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केल्याचे समजते. याच वेळी जवळच असलेल्या द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिरातही दत्तराव भोकरे (वय ७५) व सुरूबाई भोकरे (वय ७०) या वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करण्यात आला. चोरट्यांनी दोघांना मारहाण करत सुरूबाई यांच्या कानातले आणि नाकातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले.या हल्ल्यात दत्तराव भोकरे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मोटारसायकलही चोरीला गेल्याची तक्रार दाखल!
दरम्यान, त्याच परिसरातील रामेश्वर विलास राठोड (रा. पार्डी) यांची मोटारसायकलही चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सर्व घटना एकाच चोरट्यांच्या टोळीने केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनला (Police Station) कळविण्यात आली. तातडीने पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी,पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, तसेच स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch), फिंगर प्रिंट पथक, आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत झाले आहे.
एका रात्रीत दोन ठिकाणी घडलेल्या या गंभीर घटनांमुळे वालूरसह परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करून आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून (Villagers) केली जात आहे.