कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांची माहिती!
लातूर (CM of Youth Trainees) : राज्यातील 1 लाख 34 हजार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना (CM Youth Work Trainee) कायमस्वरूपी रोजगार द्यावा, या प्रशिक्षणार्थ्यांचे मानधन वाढवून द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्यावतीने मुंबईत सोमवारी (दि.14) विधान भवनावर मोर्चाचा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर (Executive Chairman Balaji Patil Chakurkar) यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत (Press Conference) दिला. याप्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.
कायमस्वरूपी रोजगाराची मागणी!
महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी संपुष्टात आणण्याच्या उदात्त हेतूने 10 लाख युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या काळात आणली. या योजनेच्या माध्यमातून 1 लाख 34 हजार प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षण योजनेमध्ये सहभाग नोंदवला. सुरुवातीला सहा महिन्याचे प्रशिक्षण होते. त्यानंतर संघटनेच्यावतीने आझाद मैदानावर मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात बेमुदत उपोषण केल्यानंतर व विविध चार मोर्चे काढल्यानंतर प्रशिक्षण कालावधी 11 महिन्यांचा केला गेला. त्याचे प्रमाणपत्र ही संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येईल. मात्र ते प्रमाणपत्र कोणत्या उपयोगात येणारे आहे? हे अद्याप स्पष्ट होत नाही, असे सांगत या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
बारावी किंवा आयटीआय पास प्रशिक्षणार्थ्यांस 20 हजार रुपये, डिप्लोमा होल्डर प्रशिक्षणार्थ्यांस 25 हजार रुपये आणि पदवीधर प्रशिक्षणार्थ्यास 30 हजार रुपये मानधन द्यावे, शासकीय व निमशासकीय सेवेत 10 टक्के आरक्षण द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष अनिकेत मांदळे, गोविंद टोम्पे, शुभम पांचाळ, आकाश सावंत, गंगाधर कुमठेकर, सुजितकुमार शिंदे आदी अनेक प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.